Hot Posts

6/recent/ticker-posts

मेढपाळांचा पोर बनला आयपीएस अधिकारी; कोल्हापूरच्या बिरदेव ढोणे यांनी मिळवलं यश - UPSC RESULT

मेढपाळांचा पोर बनला आयपीएस अधिकारी; कोल्हापूरच्या बिरदेव ढोणे यांनी मिळवलं यश - UPSC RESULT

कोल्हापूर :वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय. त्यामुळं लहानपण शेळ्या-मेंढ्यांच्या पाठीमागं फिरूनचं गेलं. शाळेत असताना पोरानं चुणूक दाखवली. दहावीच्या परीक्षेत मुरगूड केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. बारावीत असताना विज्ञान शाखेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण होऊन पुण्यात स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं. यानंतर अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजधानी दिल्ली गाठली. दोन प्रयत्नांत अपयश आलं. मात्र, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचे बिरदेव ढोणे यांनी यूपीएससीचं मैदान मारलं.

मंगळवारी जाहीर झाला यूपीएससीचा निकाल : मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांनी 551 रँक पटकावून आयपीएस पदाला गवसणी घातली. भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला. तेव्हा बिरदेव हे बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्याजवळ मेंढरं चारत होते. निकाल जाहीर झाल्याची वार्ता यमगे गावात पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरानं मिळवलेल्या लख्ख यशात उजाळून निघाला.

अधिकारी होण्याचं स्वप्न साकार : यमगे (ता. कागल) इथले सिद्धाप्पा ढोणे हे वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करतात. मुलांनी शिकून मोठं अधिकारी व्हावं, यासाठी ढोणे दांपत्यानं बिरदेव यांना लहानपणापासूनच चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले. बिरदेव यांनीही आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत शैक्षणिक कारकीर्दीत घवघवीत यश मिळवलं. पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण करून दिल्लीत बिरदेव गेली 4 वर्षे यूपीएससीची तयारी करत होते. दोन प्रयत्नात बिरदेव यांना यश मिळालं नाही. यामुळं खचून न जाता, त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवत यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 रँक मिळवून भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं.

व्हरांड्यात बसून केला अभ्यास :"गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरदेव यांना अभ्यास करण्यासाठी घरात पुरेशी विजेची सुविधा नव्हती. त्यामुळं त्यांनी व्हरांड्यात बसून अभ्यास केला," अशी आठवण वडील सिद्धाप्पा ढोणे यांनी सांगितली. "गेली चार वर्ष नियमित पुस्तक आणि वर्तमानपत्रांचे सखोल वाचन, दोन परीक्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळं झालेल्या चुका टाळून अभ्यासावर जास्तीत जास्त भर दिला," असं बिरदेव ढोणे यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं. दोन दिवसानंतर मूळ गावी ढोणे परिवार परतणार आहे, यावेळी बिरदेव यांचं जंगी स्वागत करण्याचं नियोजन गावकऱ्यांनी केलं आहे.

दिल्लीतील मित्राचा फोन आला आणि... :मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यानंतर दिल्लीतील सहकारी मित्रांनी फोनद्वारे बिरदेव ढोणे यांना "तू आयपीएस झाला आहेस" अशी आनंदवार्ता दिली. यावेळी ढोणे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आयपीएस झाल्याचा फोन आला तेव्हाही बिरदेव ढोणे घरची मेंढरं राखत होते. बेळगावजवळ ते मेंढर चारत आहेत, त्यामुळं ते दोन दिवस पायी प्रवास करून मूळ गावी पोहोचणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी गावकऱ्यांनी केली आहे.

असे तरूण देशातील अनेकांना प्रेरणा देत राहतील. अभिनंदन आणि शुभेच्छा.

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता"

परिस्थिती अनुकूल नसली म्हणून काय झालं? तशाही प्रतिकूल परिस्थितीत जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर काबाडकष्ट करून जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखल्या जाणार्‍या UPSC परीक्षेत यश मिळवता येतं हे बिरुदेव ढोणे याने सिद्ध करून दाखवलं आहे. मेंढरामागे फिरून अभ्यास केला. परीक्षा क्रॅक करून देदीप्यमान यश मिळवलं. UPSC परीक्षेचा निकाल आला तेव्हा बिरू रानात मेंढरं चारत होता. आयुष्यभर दाही दिशांना भटकंतीचं जगणं जगणाऱ्या धनगरांच्या शिक्षणात असलेल्या पुढल्या पिढ्यांना ही गोष्ट निश्चित प्रेरणा देणारी आहे. 

बिरुदेव सिद्धाप्पा ढोणे कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे(ता. कागल) गावातला रहिवासी आहे. कालच किस्सा समजला. मोबाइल हरवला म्हणून हा पठ्ठ्या तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात गेला होता. त्याची साधी तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली गेली नाही. आज हा आयपीएस अधिकारी म्हणून निवडला गेला आहे.

Post a Comment

0 Comments