पत्रकार रुपेश डोलारे यांना "जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार 2025" जाहीर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल
तुळजापूर प्रतिनिधी –पत्रकारिता क्षेत्रात आपल्या निर्भीड लेखणीतून सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पत्रकार रुपेश डोलारे यांना संत तुकाराम सामाजिक संस्था, बाबळगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या वतीने "जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार 2025" जाहीर करण्यात आला आहे. या गौरवाचे औचित्य साधत येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी, शनिवारी, साई मंगल कार्यालय, इटकळ (ता. तुळजापूर) येथे पार पडणाऱ्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार डोलारे हे गेल्या सात वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवरील वस्तुनिष्ठ व निर्भीड वृत्तांकनासाठी ते विशेष ओळखले जातात. त्यांचा कार्यभाग विशेषतः "ए आर न्यूज" या माध्यमातून सातत्याने प्रकाशित होत असून त्यांनी अनेक वेळा सामान्य जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
या पुरस्कारासाठी संस्थापक श्री. दयानंद काळुंखे (संत तुकाराम सामाजिक संस्था, बाबळगाव) आणि संस्थापक तुकाराम शिरसागर (संभाव्य प्रतिष्ठान, केशेगाव) यांनी संयुक्तपणे रुपेश डोलारे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे. पुरस्काराचे हे स्वरूप म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या तरुण पिढीचा गौरवच होय, अशी भावना संस्था प्रमुखांनी व्यक्त केली आहे.
या पुरस्कार सोहळ्यास जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल इतरही मान्यवरांना सन्मानित केले जाणार असल्याचे संस्थेने कळवले आहे.
पत्रकार रुपेश डोलारे यांनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, "हा पुरस्कार म्हणजे माझ्या सातत्यपूर्ण पत्रकारितेच्या कार्याला मिळालेली समाजाची पोचपावती आहे. ही प्रेरणा माझ्या पुढील कार्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल."
0 Comments