शारदीय नवरात्र महोत्सव: श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा -
तुळजापूर / रुपेश डोलारे प्रतिनिधी : शारदीय नवरात्र महोत्सवात आज मंगळवारी तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री. तुळजाभवानीची आज दि, 30 सप्टेंबर रोजी नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला, त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुराचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला.त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते.अशी आख्यायिका सांगितली जाते. मंगळवारी पहाटेपासूनच आई राजा उदो उदो च्या जय घोषाने तुळजाईनगरीत भक्ती सागर उसळला होता.नवरात्रामध्ये दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व असल्याने दर्शनासाठी भाविकांचा महासागर लोटला होता. 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान, सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची मोरावर आरूढ असलेली आकर्षक छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीतही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे तुळजापुरातील नवरात्र उत्सवाचे वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे.

0 Comments