धाराशिव : श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा
धाराशिव : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे हे अध्यक्षस्थानी तर कला वाणिज्य शाखा प्रमुख प्रा.कैलास कोरके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सूर्यकांत कापसे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोज डोलारे, प्रा.दत्तात्रय जाधव, प्रा.सविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी राज्यात वाचन संस्कृतीला बळ मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येत आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला असून ‘घेऊ या एकच वसा, मराठीला बनवू या ज्ञानभाषा’ ही यावर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचे सांगितले.
कला व वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा.कैलास कोरके यांनी वाचनाचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि ते केवळ ज्ञान मिळवण्यापुरते मर्यादित नाही. 'वाचाल तर वाचाल' या म्हणीनुसार, वाचन माणसाला एक समृद्ध आणि परिपक्व व्यक्ती बनवते. वाचनाची सवय लावल्यास जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे यांनी वाचनामुळे ज्ञान वाढते, कल्पनाशक्तीला चालना मिळते, ताण कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. वाचनामुळे विचार करण्याची क्षमता, सहानुभूती आणि संवाद कौशल्ये विकसित होतात, तसेच ते व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि जीवनात योग्य-अयोग्य ठरवण्यासाठी मदत करते. थोडक्यात, वाचन हे आयुष्यभर शिकण्याची आणि स्वतःला समृद्ध करण्याची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर कला व वाणिज्य शाखेतील इ.11वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांनी दीड तास आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन केले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या 'वाचन' उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इ 11 वी च्या विद्यार्थिनींनी ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ या कवितेचे काव्य गायन सादर केले. प्रा.यशवंत कोकाटे यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. ग्रंथपाल फंड सरांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्यासाठी नियमितपणे सर्वांनी ग्रंथालयात येण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांमध्ये अशा नवोपक्रमामुळे कृतीशीलतेला वाव मिळून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक प्रकारची सकारात्मकता दिसून आली. या नवोपक्रमाचे आयोजन कला व वाणिज्य शाखेच्या मराठी विभागामार्फत करण्यात आले.
या उपक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैय्या पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव बप्पा देशमुख, उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे आदींचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.यशवंत कोकाटे, प्रा.सिध्देश्वर जाधव, प्रा.राजहंस कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत जाधव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सूर्यकांत कापसे तर आभार प्रा.दत्तात्रय जाधव यांनी मानले.




0 Comments