संकल्प फाउंडेशनचे कार्य गावच्या सर्वांगीण विकासात दिशा दर्शक ठरेल – श्री. गणेश चादरे

Hot Posts

6/recent/ticker-posts

संकल्प फाउंडेशनचे कार्य गावच्या सर्वांगीण विकासात दिशा दर्शक ठरेल – श्री. गणेश चादरे

उमरगा→ संकल्प फाउंडेशनचे कार्य गावच्या सर्वांगीण विकासात दिशा दर्शक ठरेल – श्री. गणेश चादरे



उमरगा प्रतिनिधी रुपेश डोलारे : जकेकूर (ता. उमरगा):गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणाईच्या नेतृत्वातून उभे राहिलेले “संकल्प फाउंडेशन” हे सामाजिक कार्याचे नवीन पर्व ठरेल, असे मत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे (TISS) ग्रामीण विकास तज्ञ श्री. गणेश चादरे यांनी व्यक्त केले. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळा, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या  कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन श्री. गणेश चादरे यांच्या हस्ते झाले. या वेळी गावाचे सरपंच अनिल बिराजदार, माजी सरपंच शहाजी पाटील, चेअरमन विष्णू पाटील, औराद गावचे सरपंच सुशील जाधव, ह.भ.प. शरद बिराजदार महाराज, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण समाने, उपाध्यक्ष हेमंत पाटील, सचिव प्रशांत माने, कोषाध्यक्ष संतोष बिराजदार, श्री. पटेल, अविनाश नरुने, डिगु जांभळे, सुदर्शन हराळे, नागेश पाटील व तसेच जकेकूर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी चादरे यांनी, सामाजिक चळवळींचा इतिहास, NGOs आजच्या काळातील महत्व आणि सामाजिक कार्याची दिशा” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, “सामाजिक क्षेत्र हे राष्ट्रनिर्मितीचे मूळ केंद्र आहे. समाजकार्यात कार्यरत असताना अनेक आव्हाने येतात, पण त्याचबरोबर संधींचीही दारे उघडतात. युवकांनी या संधींचा योग्य उपयोग करून समाजातील सकारात्मक बदल घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”


चादरे पुढे म्हणाले की, “राजकारणात राहून समाजकार्य करणे शक्य आहे, परंतु समाजकार्यात राजकारण येऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.” गावातील तरुणांनी एकत्र येऊन संकल्प फाउंडेशनची स्थापना केली आहे ही बाब अत्यंत प्रेरणादायी असून, हे फाउंडेशन भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा दर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच त्यांनी फाउंडेशनला मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी काळात युवकांमधील वाढती व्यसनाधीनता कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करावेत, बालसंस्कार शिबिरे, आजी-आजोबा संवाद कट्टा, तसेच शेतकऱ्यांसाठी मानसिक आरोग्य व समुपदेशन कौशल्य विकास कार्यक्रम हाती घ्यावेत.


कार्यक्रमादरम्यान श्री गणेश चादरे यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश पाटील यांनी केले, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष बिराजदार यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments