अॅड. शीतल चव्हाण यांना कांस्यपदक तर कन्या स्वरा चव्हाण यांना रौप्य पदक
थायलंड येथे झालेल्या 15 व्या कल्चरल ऑलंपीयाड ऑफ परफॉरर्मिंग आर्ट्समध्ये उमरग्याचे नाव झळालले
धाराशिव : आखिल भारतीय सांस्कृतिक संघ (ABSS) संचलित "ग्लोबल कौन्सिल फॉर आर्ट अँड कल्चर (GCAC) तसेच युनेस्को (UNESCO) द्वारा थायलंड येथे आयोजित 15 व्या "कल्चरल ऑलंपीयाड ऑफ पर फॉरर्मिंग आर्ट्स (COPA)" मध्ये येथील ऍड. शीतल चव्हाण व त्यांची कन्या स्वरा चव्हाण या दोघांनी अनुक्रमे एकल नृत्य व समूह नृत्य प्रकारात सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा दि. 25/10/2025 ते दि. 29/10/2025 या दरम्यान थायलंड देशातील चोनबुरी शहरातील बुराफा विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 250 हून अधिक विविध वयोगटातील व्यक्तीचा सहभाग होता. ज्युनिअर, सिनिअर, युथ व खुला असे वयानुसार प्रकार होते. तर व्होकल, इन्स्ट्रुमेंटल व फ्री स्टाईल, कॉन्टेम्पररि, इथनिक, रिपोर्टरी, क्लासिकल, फोल्क या प्रकारातील नृत्यांचे सादरीकरण या स्पर्धेत झाले. दि. 28 रोजी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
शीतल चव्हाण यांनी खुल्या गटातून इथनिक नृत्यप्रकार एकल नृत्याद्वारे सादर केला होता. त्यांनी "शिव तांडव" व "बम भोले.." या गाण्यांवर नृत्य केले. स्वरा चव्हाण हिने ज्युनिअर गटातून 'कॉन्टेम्पररी' नृत्यप्रकार समूह नृत्याद्वारे सादर केला. यात त्यांच्या समूहाने नरसिंहा चित्रपटातील विष्णू भक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर केले. स्वराने भक्त प्रल्हादाची भूमिका पार पाडली.दि. 28 रोजी पटाया शहरातील "हॉटेल ले बाली"च्या सभागृहात पार पडलेल्या पारितोषिक वितरणात शीतल चव्हाण यांना कास्य पदक तर स्वरा चव्हाण हिला रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
उमरगा-लोहारा भागातील लोक हे गुणी व हरहुन्नरी आहेत. अनेकांनी अनेक क्षेत्रात आपले व आपल्या भागाचे नाव केलेले आहे.या सन्मानाने उमरग्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची व उमरग्याचे नाव चव्हाण बाप-लेकीच्या माध्यमातून थायलंडच्या भूमीत झळालले असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.




0 Comments