टाटा संस्थेचे कार्य ग्रामीण विकासाला दिशा देणारे — कुलगुरू प्रो. बद्री नारायण तिवारी-Umerga Live News Daily
उमरगा प्रतिनिधी/ रुपेश डोलारे: — “विकसित व आत्मनिर्भर भारताचा पाया ग्रामविकासात आहे. शाश्वत ग्रामीण विकास, स्थानिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हेच आत्मनिर्भर गावाचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. या दिशेने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) तुळजापूर कॅम्पस आणि ग्रामपंचायत जकेकुरवाडी यांची नॉलेज पार्टनरशिप ही ग्रामीण विकासाला दिशा देणारी आणि प्रेरणादायी ठरेल,” असे मत टीआयएसएसचे कुलगुरू प्रो. बद्री नारायण तिवारी यांनी व्यक्त केले.
कुलगुरू तिवारी यांच्या हस्ते “टीआयएसएस व ग्रामपंचायत जकेकुरवाडी नॉलेज पार्टनर” या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महिलांना शेळीपालन व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, ग्रामपंचायतीला गांडुळखत बेडचे वाटप तसेच आदर्श गाव पाहणी यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच श्री अमर सूर्यवंशी, टीआयएसएस तुळजापूर कॅम्पस संचालक प्रो. बाळ राक्षसे, डॉ. संपत काळे, प्रकल्प समन्वयक श्री गणेश चादरे, सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद भालेराव, श्री शंकर ठाकरे, तसेच जकेकुरवाडी व बेंडकाळ येथील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या हातात आर्थिक सबलीकरणाचा नवा उजेड
कार्यक्रमात १६ महिलांना शेळीपालनासाठी आर्थिक सहाय्य, तसेच ग्रामपंचायतीला वर्मी कंपोस्ट बेडचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिलांना उद्यमशीलतेची नवी संधी मिळून गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रो. तिवारी यांनी सांगितले.सरपंच अमर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून उभे राहिलेले जकेकुरवाडी आज ग्रामीण विकासाचे आदर्श मॉडेल गाव म्हणून उदयास आले आहे.गावांच्या प्रगतीतूनच विकसित भारताची निर्मिती” — कुलगुरू प्रो. तिवारी म्हणाले,“विकसित भारताची संकल्पना गावांच्या प्रगतीतूनच साकार होते. टीस तुळजापूर कॅम्पसचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यानी ग्रामविकासासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास पात्र असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सरपंच अमर सूर्यवंशी यांनी सांगितले की, “टीसच्या संशोधनात्मक आणि रचनात्मक अभ्यासपूर्ण आराखड्यामुळे आमच्या गावाला आदर्श बनवण्यात मोठी मदत झाली आहे. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन व क्षेत्रकार्य प्रकल्पाच्या माध्यमातून झालेली ही नॉलेज पार्टनरशिप आमचे गाव देशातील आदर्श, विकसित व आत्मनिर्भर गाव म्हणून नावारूपाला आणण्यात महत्त्वपूर्ण ठरत आहे.”
महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा
संगीता रोडगे (बेंडकाळ) म्हणाल्या,
“टाटा संस्थेने दिलेल्या एका शेळीपासून मी आज २५ शेळ्यांपर्यंत प्रगती केली आहे. ही केवळ मदत नसून आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास आहे.”
शांता मोरे म्हणाल्या,
“टीआयएसएसकडून मिळालेल्या देशी बियाणे व गांडुळखताच्या सहाय्याने मी सेंद्रिय शेती करून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.”
लक्ष्मी मोरे यांनी सांगितले,
“बेंडकाळ गावातील १०० कुटुंबांना १५ प्रकारचे देशी बियाणे, जैविक खते, औषधे व वर्मी बेड मिळाले. त्यामुळे आमचा रासायनिक खर्च कमी झाला आणि सेंद्रिय शेतीला नवे बळ मिळाले.”
“टीस सदैव ग्रामविकासासाठी कटिबद्ध” प्रो. बाळ राक्षसे
या वेळी टीस तुळजापूर कॅम्पसचे संचालक प्रो. बाळ राक्षसे म्हणाले की,“ग्रामविकासाच्या प्रक्रियेत पंचायत प्रतिनिधी, महिला गट, शेतकरी गट आणि युवक गट यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व सहकार्य देण्यासाठी टीआयएसएस सदैव कटिबद्ध आहे. लोकसहभाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून गावांचा विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री गणेश चादरे यांनी केले.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आनंद भालेराव आणि श्री शंकर ठाकरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.




0 Comments