सोलापुर: बाळे येथील श्री खंडोबा देवाची चैत्रचंपाषष्ठी यात्रेस २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ, यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर : बाळे येथील श्री खंडोबा देवाची पारंपरिक चैत्रचंपाषष्ठी यात्रा यंदा मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्टी, बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०२५ पासून उत्साहात सुरू होणार आहे. रविवार दि. ३०/११/२०२५, ०७/१२/२०२५ आणि १४/१२/२०२५ या तीन रविवारीसह एकूण चार दिवस यात्रा भरणार असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
यात्रा कालावधीत पहाटे ५.०० वाजता काकड आरती, तर सकाळी ८.०० वा. आणि रात्री ७.०० वा. महापूजा व अभिषेक करण्यात येणार आहे. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या-मुरळी नृत्य, तळी-भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे रात्री ८.०० वाजता निघणारी श्री खंडोबा देवाची पालखी आणि विद्युत रोशनाईने सजविलेले सोलापूरातून येणारे मानाचे नंदिध्वज. मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू उपस्थित राहतील, अशी माहिती देवस्थानकडून देण्यात आली आहे.
भाविकांच्या सोयीसाठी यंदा विशेष सुरक्षा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतेची तजवीज करण्यात आलेली आहे.देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विनय विजय ढेपे, सचिव सागर चंद्रकांत पुजारी, उपाध्यक्ष सुरेश पांडूरंग पुजारी, सदस्य आदिनाथ मल्हारी पुजारी, सदस्य कल्लेश्वर रमेश पुजारी तसेच समस्त पुजारी मंडळी यात्रेचे नियोजन व दर्शन व्यवस्थेत पूर्ण वेळ सहभागी होणार आहेत.
या यात्रेची सांगता पौष शुद्ध षष्ठी बांगरषष्ठी शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी महाप्रसाद वाटपाने होणार असून सर्व मानकरी — पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे आणि भाविकांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप करून यात्रेचा समारोप केला जाईल.

0 Comments