दुर्दैवी घटना : पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविताना पतीही बुडाला ;केज तालुक्यातील घटना-Beed-Kej Police Station Crime
बीड : पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचाही पत्नीसह मृत्यू झाल्याची घटना 5 डिसेंबर रोजी दुपारी केज तालुक्यातील वाघेबाभळगाव शिवारात घडली .या प्रकरणाची 8 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाघेबाभुळगाव शेजारीच असलेल्या पवारवाडी येथील शेतकरी भास्कर विनायक पवार पत्नी अलका पवार व मुलगा ऋषिकेष तिघेही 5 डिसेंबर रोजी वाघेबाभुळगाव शिवारातील शेतात खुरपणी करीत होते. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास अलका पवार या पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्या त्यांना वाचण्यासाठी त्यांचे पती भास्कर पवार यांनीही विहिरीत उडी मारून पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अलका पवार व भास्कर पवार या दोघा पती-पत्नीचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या दोन्हीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून नांदूर घाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन करण्यात आले सुग्रीव शंकर पवार यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक उनवणे हे तपास करीत आहेत.

0 Comments