धाराशिवमध्ये ‘फिजिक्स वाला’ (PW) आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांचा भव्य पालक–विद्यार्थी–शिक्षक संवाद मेळावा संपन्न-Shripatrav Bhosle High School Dharashiv
धाराशिव दि, २२ : शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज आणि देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था ‘फिजिक्स वाला’ (PW) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पालक–विद्यार्थी–शिक्षक संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे व भविष्यातील शैक्षणिक आव्हानांचे योग्य नियोजन करणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे सीईओ श्री. आदित्यभैया पाटील व प्रशासकीय अधिकारी डॉ. सौ. मंजुळा आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी भूषविले. व्यासपीठावर उपप्राचार्य श्री. संतोष घार्गे, ‘फिजिक्स वाला’चे मॅनेजर श्री. श्यामसुंदरम मिश्रा व समन्वयक श्री. अरविंद भगत उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान पालक व विद्यार्थ्यांनी अध्यापन पद्धतीविषयी विविध समस्या व प्रश्न उपस्थित केले. यावर उपप्राचार्य संतोष घार्गे यांनी सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील, अशी ठाम ग्वाही दिली.
मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, धाराशिव येथील ‘फिजिक्स वाला’ शाखेने गेल्या वर्षभरात एनईईटी (नीट) व जेईई परीक्षेच्या तयारीत विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. केवळ कोचिंगपुरते मर्यादित न राहता संकल्पनात्मक स्पष्टता, शिस्तबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव व योग्य मार्गदर्शन ही यशाची चतु:सूत्री असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते. आजचा संवाद मेळावा विद्यार्थ्यांच्या यशाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पालक व विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या सोडविणे ही संस्थेची जबाबदारी असून ती आम्ही पूर्णपणे स्वीकारत आहोत.”
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त व स्वयंअध्ययनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे २२ गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘फिजिक्स वाला रायझिंग स्टार २०२६ – महाराष्ट्र रीजन’ या पुरस्काराने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे, महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य, ‘फिजिक्स वाला’चे व्यवस्थापक व संपूर्ण प्राध्यापक वर्ग, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. व्ही. जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एस. एस. सदाफुले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमा ताई पाटील व प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख यांचे सहकार्य लाभले.




0 Comments