चिवरी पंचायत समिती गणामध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?दोन्ही पक्षाच्या उमेदवारासमोर असणार मोठे आव्हान
तुळजापुर/बिभिषन मिटकरी : चिवरी पंचायत समिती गणातील निवडणूक प्रचार सध्या निर्णायक वळणावर पोहोचला असून, अपक्ष उमेदवार माजी सैनिक संभाजी काळजाते यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्हु प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. गावोगावी सुरू असलेल्या अंतर्गत डोअर टु डोअर भेटीदरम्यान सर्वसामान्य, गोरगरीब कुटुंबातील मतदार अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा देताना दिसत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींविरोधात गोरगरीब जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “हे नेते पाच वर्षांतून एकदाच मतांची भीक मागायला येतात, निवडून आल्यावर मात्र जनतेच्या समस्या त्यांना दिसत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत आहे.रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, वीज, घरकुल, आरोग्य सुविधा अशा अनेक मूलभूत प्रश्नांकडे आजवर दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. निवडून गेलेले सदस्य सर्वसामान्य मतदारांवर राज्य करतात आणि पुढे जाऊन पक्षनेत्यांची गुलामी करतात, अशी भावना उघडपणे व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठे नेते गोरगरीबांच्या दारात नमस्कार करताना दिसत असले तरी, हाच नेता निवडणुकीनंतर डोकावूनही पाहत नाही, अशी टीका मतदारांकडून होत आहे. “मतदारांनी नमस्कार घातला तरी मान न उचलणारे नेते आता मताचा जोगवा दिवस-रात्र हेलपाटे करत आहेत,” असा संतापजनक सूर गावागावात ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवार माजी सैनिक संभाजी काळजाते यांचा अंतर्गत गावभेट दौरा सुरू असून, दोन्ही पक्षांवर नाराज असलेले स्थानिक नेते व कार्यकर्तेही त्यांना अंतर्गत पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे. “चिवरी पंचायत समिती गणातील जनता हुशार आहे, मात्र पर्याय नव्हता म्हणून आतापर्यंत या पक्षांना मतदान केले,” असा टाहो अनेक गावांतून फोडला जात आहे.
आता मात्र जनतेच्या अडीअडचणी समजून घेणारा, आपलाच माणूस म्हणून अपक्ष उमेदवार माजी सैनिक संभाजी काळजाते यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येणाऱ्या चिवरी पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवाराकडून जोरदार टक्कर मिळणार असून, अपक्ष ‘भारी’ ठरणार, अशी जोरदार चर्चा संपूर्ण चिवरी गणात रंगली आहे.

0 Comments