खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग - तुळजापूर पोलिस ठाण्यात ACBचा सापळा; सहायक पोलीस उपनिरीक्षक ५ हजारांची लाच एसीबीच्या जाळ्यात- -Acb Trap Tuljapur Police Station
धाराशिव, दि. ४ मार्च २०२६ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) धाराशिव पथकाने तुळजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात धडक कारवाई करत सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील ठोस संदेश पुन्हा एकदा देण्यात आला आहे.
आरोपीचे नाव श्रीनिवास रामदास आरदवाड (वय ४८) असून ते तुळजापूर पोलिस ठाणे येथे सहायक पोलीस उपनिरीक्षक (वर्ग-३) म्हणून कार्यरत आहेत. या कारवाईमुळे खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा डाग लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेचे रक्षकच भक्षक झाले असल्याची टीका होत आहे.
तक्रारीनंतर पडताळणी व सापळा
तक्रारदाराने ACB, धाराशिव कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने यापूर्वीच १० हजार रुपये घेतले होते. पुढे गुन्ह्यात अतिरिक्त कलम वाढवू न देणे व मोटारसायकल जप्त न करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराशी झालेल्या चर्चेनंतर व्यवहार ५ हजार रुपयांवर ठरल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
दि. ४ मार्च रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदार व पंच क्रमांक १ यांना तुळजापूर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. आरोपीने ५ हजार रुपयांची स्पष्ट मागणी केल्याची खात्री झाल्यानंतर ACB पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानुसार आरोपीला पोलिस ठाण्याच्या आवारातच ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपीच्या अंगझडतीत रोख रक्कम व साहित्य जप्त
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत खालील वस्तू जप्त करण्यात आल्या:
-
५,३०० रुपये रोख रक्कम
-
विवो कंपनीचा मोबाईल
-
पोलीस ओळखपत्र
-
चाव्यांचा गुच्छ
-
पांढरा रुमाल
-
निळा कंगवा
-
पेन व काळा चष्मा
याप्रकरणी आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरझडती व मोबाईल तपासणीची कारवाईही हाती घेण्यात आली आहे.
या सापळा कारवाईतील अधिकारी व पथक
ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे (ACB, धाराशिव) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करीत असून पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे करीत आहेत. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (ACB, छत्रपती संभाजीनगर) यांचे होते.
पथकात पोहेकॉ आशिष पाटील, पोलिस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी तसेच चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.
पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही वर्षांत चांगलेच वाढले आहेत, तरीही ‘वरकमाई’साठी लाचखोर पोलिस मागेपुढे पाहत नाहीत. अशा लाचखोरांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी तक्रारदार धाडस करताना दिसून येत आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही तक्रारदारांना सातत्याने आवाहन केले जाते. त्याचा परिणाम म्हणून पोलिस दलातील लाचखोरांविरुद्ध तक्रारदार पुढे येत आहेत. या कारवाईमुळे पोलिसांच्या खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग लागल्याचे दिसून येते.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी.
संपर्क क्रमांक :
-
टोल फ्री : १०६४
-
व्हॉट्सॲप : ९२७०२३१०६४
-
पोलीस अधीक्षक, ACB छ. संभाजीनगर : ९०११०९२७७७
-
पोलीस उपअधीक्षक, ACB धाराशिव : ९०४९५१९८३३
लाचखोरीविरोधातील ACBची ही धडक कारवाई सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत असून, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

0 Comments