दुबईत अडकलेल्या उमरग्यातील ज्येष्ठ नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी शासनाला निवेदन-Iran-Isjrael war New
*ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचा पुढाकार
उमरगा : इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम म्हणून संयुक्त अरब अमिरात (दुबई) येथे अडकलेल्या उमरगा येथील चार ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे सविस्तर निवेदन दिनांक 04 मार्च 2026 रोजी ई-मेलद्वारे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी, धाराशिव तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा यांना पाठविण्यात आले आहे. तसेच दि. 05 मार्च 2026 (गुरुवार) रोजी मा. तहसीलदार साहेब, उमरगा यांना प्रत्यक्ष भेटूनही हे निवेदन देण्यात येणार आले आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारेही संपर्क साधून तातडीने मदत करण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
निवेदनानुसार उमरगा शहरातील काही नागरिक पर्यटनासाठी दुबई येथे गेले असताना सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक व प्रवासावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उमरगा येथील चार ज्येष्ठ नागरिक दुबई येथे अडकून पडले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीय व स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दुबई येथे अडकलेल्या नागरिकांची नावे शिवानंद गुंडप्पा दळगडे, रा. शिवपुरी कॉलनी, उमरगा,सुजाता शिवानंद दळगडे, रा. शिवपुरी कॉलनी, उमरगा,शिवानंद इरसंगप्पा माशाळकर, रा. उमरगा, मीनाक्षी शिवानंद माशाळकर, रा. उमरगा अशी आहेत.
या नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) तसेच भारतीय दूतावास-अबुधाबी/दुबई यांच्याशी तातडीने संपर्क साधून आवश्यक ती मदत करावी, तसेच आवश्यक असल्यास विशेष उड्डाण किंवा आपत्कालीन व्यवस्था करून त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने देण्यात आले असून त्यावर सत्यनारायण जाधव, व्यंकट उर्फ राजू भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, ज्योती माने, धानय्या स्वामी, शबाना उडचणे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण, ऍड. ख्वाजा शेख, कविता साळी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि मानवी दृष्टीकोनातून महत्त्वाचा असल्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

0 Comments