ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची तक्रार केल्याच्या रागातून एकावर हल्ला; सात जणांवर गुन्हा दाखल -Dharashiv Crime News FIR
धाराशिव : ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची तक्रार केल्याच्या रागातून एका नागरिकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच काठी व स्प्रिंकलरच्या पाईपने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वाघोली येथे घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल हरिबा धुमाळ (वय 56, रा. वाघोली ता. जि. धाराशिव) यांनी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली होती. याच कारणावरून आरोपींनी राग धरून त्यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास वाघोली ते सांजा रोडलगत वाघोली येथे ही घटना घडली. या वेळी आरोपींनी एकत्र येत अनिल धुमाळ यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत स्प्रिंकलरचा पाईप व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या मोटरसायकलवर दगड मारून नुकसान केले. यावेळी “तक्रार का करतोस” असे म्हणत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी अमरचंद नानासाहेब खडके, रोहीत बालाजी मगर, मनोज घमाजी शेंडगे, अर्जुन बब्रुवान खडके, प्रदिप बब्रुवान खडके आणि सुलभा संजय खडके (सर्व रा. वाघोली ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल धुमाळ यांनी दि. 10 मार्च 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(1), 190, 324(4)(5), 126(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.

0 Comments