मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीस ४ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा -कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल -District And Session Court Judgement Kalanb
धाराशिव : कळंब तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी आरोपी महेश महादेव कदम यास कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे एक महिना सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश आर. के. राजे भोसले यांनी दि. 27 रोजी हा निकाल दिला.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा शासकीय अभियोक्ता अॅड. आशिष कुलकर्णी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
घटनेचा तपशील
सरकारी वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 25 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी गावातील दुकानातून साखर घेऊन घरी परतत असताना आरोपी महेश कदम याने तिला रस्त्यात अडवले. त्याने तिचा हात पकडून तिची छेडछाड केली.
पीडित मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगण्याची धमकी दिल्यावर आरोपीने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वीही आरोपी मागील महिनाभरापासून मुलीचा पाठलाग करून रस्त्यात अडवून त्रास देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या घटनेनंतर मुलीने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी आरोपीला जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्याने त्यांनाही मारहाण केली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
तपास व न्यायालयीन कार्यवाही
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नेहाकर व पुजरवा यांनी करून दोषारोपपत्र कळंब जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. सादर करण्यात आलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीस चार वर्षे एक महिना सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा भोगण्याचा आदेश दिला.
या निकालामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, महिलांवरील अत्याचार प्रकरणांत न्यायालय कठोर भूमिका घेत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

0 Comments