नळदुर्ग: भरधाव पिकअपची -मोटरसायकलला समोरासमोर धडक; जळकोटवाडी येथील तरुणाचा मृत्यू; पिकप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल-
धाराशिव : तालुक्यातील जळकोटवाडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मयत संस्कार मधुकर देडे (वय १९ वर्षे, रा. जळकोटवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव) हे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.०० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून जात होते. दरम्यान, पिकअप क्रमांक एमएच २७ एक्स ३२३४ चा चालक अजय बहादुर रामप्रताप पाल (वय ३१ वर्षे, रा. गणेशपुर मजरे, कुशमहुरा महाराजगंज, रायबरेली, उत्तर प्रदेश) याने आपल्या ताब्यातील पिकअप वाहन भरधाव, हायगयी व निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवत मोटरसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत संस्कार देडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जळकोटवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी फिर्यादी ओमकार मधुकर देडे (वय २१ वर्षे, रा. जळकोटवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम २८१, १२५ (अ)(ब), १०६ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस पुढील तपास करत असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments