परंडा तालुक्यात 40 गोवंशीय वासरांची कत्तलीसाठी क्रूर वाहतूक उघड; चालकावर गुन्हा दाखल-Crime News
धाराशिव (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील करमाळा–धाराशिव रोडवर रोसा गावाजवळ अवैधरीत्या गोवंशीय वासरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 40 वासरे निर्दयीपणे कोंबून नेली जात असल्याचे आढळून आले असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आरोपी तोफीक निसार मुलानी (वय 35, रा. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हा पिकअप वाहन (क्र. MH 12 DT 1122) मधून गोवंशीय जातीची 40 वासरे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून वाहन अडवले असता, त्या वाहनात वासरांचे तोंड व पाय बांधून अत्यंत कमी जागेत कोंबून ठेवले असल्याचे दिसून आले. या वासरांना हालचाल करता येणार नाही अशा अवस्थेत ठेवल्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात अंदाजे 2 लाख रुपये किंमतीची वासरे आणि सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी परंडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम 5(अ), 5(ब), 9(ब), 11 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांसह प्राण्यांच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

0 Comments