अणदूर येथुन घरासमोरून ४० हजारांची मोटरसायकल चोरी; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल-Naldurg Crime
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात घरासमोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागनाथ लक्ष्मण चव्हाण (वय ३४, रा. वात्सलानगर, चिवरी पाटी, अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे अंदाजे १.४० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल (क्र. MH 25 AG 8618) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
सदर मोटरसायकलीची किंमत सुमारे ४०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर फिर्यादी नागनाथ चव्हाण यांनी दि. १६ एप्रिल २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

0 Comments