Tuljapur News तुळजापूरमध्ये बँक फसवणुकीचा प्रयत्न उधळला; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
📍 धाराशिव | प्रतिनिधी:- तुळजापूर शहरातील एस.बी.आय. बँक शाखेत बनावट कागदपत्रांच्या (Fraud Doucement)आधारे फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनमंत दगडू घोडगे (वय 70 वर्षे) आणि मनिषा संदीप गायकवाड (वय 25 वर्षे, दोघे रा. कामटी, ता. ग्रामीण सोलापूर, जि. सोलापूर) यांनी दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजता तुळजापूर येथील एस.बी.आय. बँक शाखा (नळदुर्ग रोड) येथे संगनमताने गुन्हा करण्याचा प्रयत्न केला.
या दोघांनी दुसऱ्या खातेदाराच्या नावाने डुप्लिकेट आधार कार्ड तयार करून त्याद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा बनाव केला. त्यानंतर संबंधित खातेदाराच्या नावाने डुप्लिकेट पासबुक (Duplicate pasbook)मिळवण्याचा प्रयत्न केला. पासबुक मिळाल्यानंतर शिवाजी बाबुराव उळेकर (रा. तुळजापूर) यांच्या खात्यातून पैसे काढण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही बाब बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. याप्रकरणी फिर्यादी ओमकार धोंडीराम कांबळे (वय 27 वर्षे), कर्मचारी, एस.बी.आय. बँक शाखा तुळजापूर यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम(BNS) 318(4), 62, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे बँक व्यवहारांमध्ये (Bank Trancation) फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, नागरिकांनी आपली वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

0 Comments