मौजे इटकळच्या विकासासाठी शंकर वाघमोडे यांची धडपड; हॉटेल व्यवसायातील २५% नफा गावासाठी खर्च करण्याचा संकल्प.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*इटकळ गावच्या विकासासाठी शंकर वाघमोडे यांचा पुढाकार,१०० तरुणांना केले व्यसनमुक्त.*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*इटकळ मध्ये विकासाची गती, शंकर वाघमोडे ठरतात गावाचे देवदूत.*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):-
तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथे सामाजिक कार्याची प्रेरणादायी चळवळ उभी राहताना दिसत आहे. येथील राम भरोसा हॉटेलचे मालक शंकर रामचंद्र वाघमोडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेत विविध उपक्रम राबवले असून ग्रामस्थांतून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून वाघमोडे यांनी गावातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीटंचाईची तीव्र समस्या लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या खर्चातून तब्बल ५५० फूट खोल बोअरवेल घेतली. पाणी उपलब्ध होताच ज्या भागात पाण्याची टंचाई होती त्या ठिकाणी घरोघरी नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.या शिवाय, विद्युत लोडमुळे शेतकऱ्यांच्या बंद पडलेल्या डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉइंट्स) तात्काळ बदलून देत शेतीच्या कामात येणारे अडथळे दूर केले.गावातील वाढत्या मद्यपानाच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे लक्षात घेऊन वाघमोडे यांनी मोठा सामाजिक उपक्रम राबवला. त्यांनी जवळपास १०० तरुणांना स्वतःच्या खर्चाने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्यांना नवजीवन दिले.तसेच अधिक मासाच्या पवित्र कालावधीत गावातील महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडावे या हेतूने परळी वैजनाथ, गाणगापूर, अक्कलकोट व पंढरपूर येथे आरामदायी बसद्वारे दर्शन यात्रा आयोजित केली. “मी या गावात लहानाचा मोठा झालो त्यामुळे माझ्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यापैकी २५ टक्के रक्कम गावाच्या विकासासाठी खर्च करणार,” असा संकल्प शंकर वाघमोडे यांनी व्यक्त केला.
गाव व्यसनमुक्त करून सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा निर्धार असून त्यांच्या या कार्यामुळे ते गावकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरत आहेत. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्व ग्रामस्थांकडून त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करण्यात येत आहे.भविष्यात इटकळ गावाला तालुक्यात वेगळी ओळख मिळवून देण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

0 Comments