तुळजापुर: कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप; अधिकाऱ्यांशी गैरवर्तन; महसूल सेवक औदुंबर गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई”-Tuljapur Suspend Live News
धाराशिव : प्रतिनिधी :- तुळजापूर तालुक्यातील काटगाव सज्जाचे महसूल सेवक श्री. औदुंबर प्रकाश गिरी यांच्यावर गंभीर शिस्तभंग, कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप आणि गैरवर्तनाच्या आरोपांमुळे तहसील प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या आदेशानुसार श्री. गिरी यांना तत्काळ प्रभावाने शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. औदुंबर गिरी यांची काटगाव सज्जावर महसूल सेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीच्या ठिकाणी नियमितपणे हजर राहत नसल्याबाबत तसेच रुजू झाल्याचा अहवाल वेळेत सादर न केल्याबाबत प्रशासनाकडून त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांच्या रुजू झाल्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला.
दरम्यान, नियुक्त केलेल्या सज्जावर नियमित कामकाज न करता तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कामकाजात वारंवार हस्तक्षेप केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. याबाबत त्यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. खुलाशामध्ये त्यांनी काटगाव येथे नियमित कामकाज करत असल्याचा दावा केला. तसेच नागरिकांच्या कामांच्या चौकशीसाठी व शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने पुरवठा विभागात जाणे हे आपल्या कर्तव्याचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, ग्राम महसूल अधिकारी काटगाव यांनी सादर केलेल्या अहवालात श्री. गिरी हे तलाठी कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने खातेदारांच्या तक्रारी वाढत असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात श्री. गिरी यांनी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या दालनात प्रवेश करून संचिका हाताळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, पुरवठा विभागाच्या कामकाजात विनाकारण हस्तक्षेप करणे, अधिकाऱ्यांशी उद्धटपणे वागणे, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या व संगणक त्यांच्या अनुपस्थितीत वापरणे तसेच कार्यालयीन शिस्त भंग करणाऱ्या कृती केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुरवठा विभागातील एका लिपिकानेही श्री. गिरी यांनी अनावश्यक प्रश्न विचारून कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा लेखी अहवाल दिला आहे.
दफेदारांनी सादर केलेल्या अहवालानुसार, श्री. गिरी यांनी जानेवारी २०२६ पासून काटगाव सज्ज्याचे टपालदेखील नियमितपणे स्वीकारले नसल्याचे समोर आले आहे. महिला अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन असंबंधित विषयांवर वाद घालणे आणि गैरवर्तन करणे हे शासकीय सेवकाला न शोभणारे कृत्य असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी श्री. औदुंबर प्रकाश गिरी यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा आदेश जारी केला. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय तहसील कार्यालय, तुळजापूर असेल. तसेच तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही आणि कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थिती नोंदविणे त्यांच्यासाठी बंधनकारक राहणार आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी चर्चा सुरू असून शिस्तभंगाच्या प्रकरणांबाबत प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



0 Comments