“‘वाघ चालला वाघाच्या कळपात!’ तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांच्या स्वागत बॅनरने राजकीय चर्चांना उधाण”

Hot Posts

6/recent/ticker-posts

“‘वाघ चालला वाघाच्या कळपात!’ तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांच्या स्वागत बॅनरने राजकीय चर्चांना उधाण”

“‘वाघ चालला वाघाच्या कळपात!’ तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांच्या स्वागत बॅनरने राजकीय चर्चांना उधाण”


तुळजापूर/ प्रतिनिधी : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षबदलाच्या चर्चांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना तुळजापूर शहरात झळकलेल्या स्वागताच्या बॅनरने या चर्चांना आणखी वेग दिला आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या या बॅनरने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.

“वाघ चालला वाघाच्या कळपात” असा ठळक आणि लक्षवेधी मजकूर असलेल्या बॅनरद्वारे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे फलक तुळजापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अमोल जाधव व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने लावण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खासदार निंबाळकर यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चांना नव्याने बळ मिळाले आहे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना ठाकरे गटातील काही नेते व लोकप्रतिनिधी शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नावही चर्चेत आले आहे. मात्र त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, तुळजापुरात स्वागताचे बॅनर झळकल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे हे फलक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात लागल्यामुळे या घडामोडींना अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही बॅनरबाजी केवळ स्वागतापुरती मर्यादित आहे की आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments