शासकीय निवासशाळेत विद्यार्थ्याला मारहाण; डोळ्याला गंभीर दुखापत, हेडमास्तर व शिक्षकांसह तिघांवर गुन्हा-Dharashiv Crime News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय निवासशाळेत विद्यार्थ्याला मारहाण; डोळ्याला गंभीर दुखापत, हेडमास्तर व शिक्षकांसह तिघांवर गुन्हा-Dharashiv Crime News Live

शासकीय निवासशाळेत विद्यार्थ्याला मारहाण; डोळ्याला गंभीर दुखापत, हेडमास्तर व शिक्षकांसह तिघांवर गुन्हा-Dharashiv Crime News Live 

धाराशिव , प्रतिनिधी : गोलेगाव येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासशाळेत विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी हेडमास्तर, शिक्षक आणि दोन अनोळखी मुलांविरोधात परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन आसाराम तावडे (वय 15, रा. अशोकनगर तातवडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीनुसार, दि. 27 मार्च 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गोलेगाव येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासशाळेत काही मुलांमध्ये वाद व भांडण सुरू होते. त्यावेळी पवन तावडे हे तेथे गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली.

या हाणामारीदरम्यान एका मुलाने मारलेली बुक्की आणि टोचा त्यांच्या डाव्या डोळ्यावर जोरात लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीमुळे त्यांचा डोळा पूर्णपणे सुजला, रक्तस्त्राव झाला आणि पुढे डोळा निकामी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात निवासशाळेचे हेडमास्तर व शिक्षक यांच्याही निष्काळजीपणाचा आणि भूमिकेचा उल्लेख करण्यात आला आहे.

या घटनेची तक्रार पवन तावडे यांनी दि. 8 जून 2026 रोजी परंडा पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2), 49 तसेच बालकांची काळजी व संरक्षण अधिनियमाच्या कलम 75 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा पुढील तपास परंडा पोलिस करीत असून, संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या डोळ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments