/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! ऑनलाइन फसवणुकीतील तब्बल ₹19 लाखांची रक्कम फिर्यादींना परत-Online Fraud Dharashiv News

Hot Posts

सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! ऑनलाइन फसवणुकीतील तब्बल ₹19 लाखांची रक्कम फिर्यादींना परत-Online Fraud Dharashiv News

सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! ऑनलाइन फसवणुकीतील तब्बल ₹19 लाखांची रक्कम फिर्यादींना परत-Online Fraud Dharashiv News 


धाराशिव | प्रतिनिधी

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव सायबर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत ऑनलाइन फसवणुकीतील तब्बल ₹19 लाखांची रक्कम फिर्यादींना परत मिळवून दिली आहे. तातडीने कारवाई करत संबंधित बँकांशी समन्वय साधून आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण रक्कम फिर्यादींच्या खात्यात परत करण्यात सायबर पोलिसांना यश आले.

सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे श्री. मोहित सिद्धेश्वर भुजबळश्री. रोहित सिद्धेश्वर भुजबळ, दोघेही रा. वत्सलानगर, अणदूर, ता. जि. धाराशिव यांनी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबत एनसीसीआर (NCCR) पोर्टलवर तक्रार नोंदविली होती. या फसवणुकीत मोहित भुजबळ यांची ₹14 लाख, तर रोहित भुजबळ यांची ₹5 लाख, अशी एकूण ₹19 लाखांची फसवणूक झाली होती.

तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलिसांनी विलंब न करता संबंधित बँकांशी पत्रव्यवहार करून आरोपींच्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग झालेली रक्कम तातडीने गोठविली. त्यानंतर संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रयत्नांमुळे फिर्यादींची संपूर्ण ₹19 लाखांची रक्कम सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सपोनि कासुळे, पोलीस अंमलदार सूर्यवंशी, हालसे, जाधवर, शेख, बिराजदार, गाडे, शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.

नागरिकांसाठी सायबर पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

सायबर पोलीस ठाण्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेले फोन, मेसेज, लिंक किंवा QR कोड यावर विश्वास ठेवू नये. खात्री केल्याशिवाय कोणालाही बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड तपशील, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा QR कोड स्कॅन करू नये.

सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, तसेच www.cybercrime.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन धाराशिव सायबर पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments