गंधोरा पाटीजवळ कुटुंबाला अडवून सशस्त्र दरोडा; ६४ हजारांचा ऐवज लुटला
तुळजापूर | प्रतिनिधी : बालाघाट न्यूज टाइम्स
शिर्डी येथून देवदर्शन करून कलबुर्गीकडे जात असलेल्या कुटुंबाला तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील गंधोरा पाटीजवळ अडवून चार अनोळखी इसमांनी लोखंडी रॉड, पाइप व चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच वाहनाची काच फोडून कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेल्याची धक्कादायक घटना २० ऑगस्ट रोजी रात्री घडली.
याबाबत काजल संदीप पवार (वय ३०, रा. उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, काजल पवार या आपल्या कुटुंबासह शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटोपल्यानंतर त्या कुटुंबासह कलबुर्गी येथे जात होत्या. दरम्यान, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर-नळदुर्ग रोडवरील गंधोरा पाटीजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांचे वाहन अडवले.
या चौघांनी लोखंडी रॉड, पाइप व चाकूचा धाक दाखवत वाहनातील कुटुंबीयांना मारहाण केली. त्यानंतर वाहनाची काच फोडून कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला व चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेमुळे तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर कुटुंबाला अडवून सशस्त्र पद्धतीने लूट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
काजल पवार यांनी दि. २१ ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याचे काम नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

0 Comments