माळुंब्रा येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाची हत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल-Murder Crime News Daily
तुळजापुर | प्रतिनिधी : माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून २७ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद बाळू मस्के (वय २७, रा. तरटगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृताची आई रुक्मिणी बाळू मस्के (वय ४५) यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता माळुंब्रा गावाकडे जाणाऱ्या हायवेजवळ अरविंद मस्के याच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपी विशाल वडणे आणि ओंकार वडणे (दोघे रा. माळुंब्रा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी विशाल वडणे यांच्या पत्नीशी अरविंदचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून त्याला मारहाण करून जिवे ठार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर या प्रकरणी मृताची आई रुक्मिणी मस्के यांनी २२ ऑगस्ट २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) (खून), ११५(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(२)(व्ही) व ३(२)(व्हीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याची पद्धत आणि इतर बाबींचा तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत. आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

0 Comments