तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, महिला जखमी
तुळजापूर : तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील गंधोरा पाटी व चिवरी पाटीजवळील बूस्टर परिसरात गुरुवारी (दि. 13 ऑगस्ट) दुपारी ट्रक आणि दुचाकी स्कुटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, सोबत असलेली एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या दोघांना ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती भालगाव येथील दराडे कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील महिला जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळ या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला पकडण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातांचे वाढते प्रमाण; स्पीड ब्रेकरची मागणी
नळदुर्ग-तुळजापूर मार्गावर मागील दोन-तीन दिवसांपासून वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिक आणि प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गावर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments