इटकळ: टिबी मुक्त ग्रामपंचायत अभियानात इटकळ ग्रामपंचायतीचा गौरव
----------------------------------------
ब्राँझ पारितोषिक, सन्मानपत्र व महात्मा गांधींचा पुतळा देऊन सन्मान.
----------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) ::- केंद्र व राज्य शासनाच्या टिबी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत इटकळचा ब्राँझ पारितोषिक, सन्मानपत्र व राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा देऊन गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीने क्षयरोग निर्मूलनाच्या जनजागृतीसह संशयित रुग्णांचा शोध, तपासणी व उपचारासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.या अभियानाचा मुख्य उद्देश गावपातळीवर क्षयरोगाबाबत जनजागृती निर्माण करणे, संभाव्य क्षयरुग्णांचा शोध घेणे, त्यांची वेळेत तपासणी व उपचार करणे तसेच नागरिकांच्या सहभागातून गाव टिबीमुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे हा आहे. या उद्देशाने ग्रामपंचायत इटकळच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित कार्यक्रमात मा. सभापती, मा. उपसभापती, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत इटकळचा ब्राँझ पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीला महात्मा गांधींचा पुतळा प्रदान करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी नितीन कांबळे, आशा गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. टिबी निर्मूलनाच्या अभियानात ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि आशा सेविकांनी केलेल्या समन्वयपूर्ण कामामुळे हा सन्मान मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.क्षयरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार असून त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, लक्षणे असलेल्या व्यक्तींनी वेळेत तपासणी करून घेणे आणि उपचाराचा पूर्ण कालावधी पाळणे आवश्यक आहे. ‘टिबीमुक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी इटकळ ग्रामपंचायतीने केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, हा पुरस्कार गावाच्या आरोग्यविषयक सामूहिक प्रयत्नांना मिळालेली पावती मानली जात आहे.इटकळ ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडूनही अभिनंदन व्यक्त करण्यात येत असून, आगामी काळातही गाव टिबीमुक्त ठेवण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

0 Comments