शेतजमिनीच्या वादातून कोयता, काठीने जीवघेणा हल्ला; उमरग्यात चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल-Umerga Crime News Live
उमरगा, प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी परिसरात शेतजमिनीच्या वादातून एका कुटुंबावर काठी, कोयता तसेच लाथाबुक्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमलबाई शिवाजी जाधव (वय 55, रा. बलसुर तांडा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये तानाजी रेवा जाधव (रा. बलसुर), छायाबाई तानाजी जाधव (रा. बलसुर), अविनाश चव्हाण (रा. लिंबाळा तांडा) आणि अर्जुन जाधव (रा. बलसुर, ता. उमरगा) यांचा समावेश आहे.
फिर्यादीनुसार, दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास गुंजोटी येथे शेताच्या वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी विमलबाई जाधव तसेच त्यांचे पती आणि मुलगा यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करत काठी व कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी विमलबाई जाधव यांनी दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2), 118(1), 333, 115(2), 352, 351(2)(3) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास उमरगा पोलीस करीत आहेत

0 Comments