धुळेतील गरोदर महिलेच्या खून-प्रकरणातील फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात-Murder Crime Accused Areest
फारुख शेख व महिला आरोपीला केज रोडवरून पकडले; गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त
कळंब : धुळे जिल्ह्यातील नरवाळ परिसरात गरोदर महिलेचा मारहाण करून निर्घृण खून केल्यानंतर तिचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केल्याच्या गंभीर प्रकरणातील फरार असलेले दोन आरोपी कळंब पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. फारुख हजु शेख (वय 29, रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, ह.मु. शेरे गल्ली, कळंब) आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय 26) या दोघांना कळंब-केज रोडवरील 7/12 हॉटेलसमोरून ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची होंडा मोबिलो कारही कळंब शहरातून बेवारस अवस्थेत जप्त करण्यात आली.
दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी नरवाळ, ता. व जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गावरील मुरमा टेकड्यालगतच्या वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी एका अनोळखी गरोदर महिलेचा मारहाण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर तिचे प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाणे, जिल्हा धुळे येथे गुन्हा क्र. 322/2026, कलम 103(1) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान मृत महिलेची ओळख नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय 31, रा. जामखेड कलाकेंद्र) अशी पटली. या प्रकरणात सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन, आरीफ ऊर्फ खुज्या आसीफ शेख, लक्ष्मी बालाजी पवार, स्वाती ऊर्फ आरती गणेश कुहाडे, फारुख हजु शेख आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
यातील पहिल्या चार आरोपींना यापूर्वीच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र फारुख शेख आणि महिला आरोपी रोहिणी जाधव हे फरार होते. तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची मोबिलो कारही पोलिसांच्या ताब्यात आलेली नव्हती.
दरम्यान, 27 सप्टेंबर 2026 रोजी कळंबचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार पुरुष व महिला आरोपी कळंबहून केज रोडकडे जेवणासाठी जाणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलीस हवालदार अजीज शेख आणि महिला पोलीस अंमलदार सपना गिते यांच्या पथकाने केज रोडवरील 7/12 हॉटेल परिसरात सापळा रचला.
काही वेळाने संशयित महिला व पुरुष तेथे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांनी आपली नावे फारुख हजु शेख आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे अशी सांगितली. त्यांचे छायाचित्र मोहाडीनगर पोलिसांकडे पाठवून ओळख पटविण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींना कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पुढील तपासासाठी मोहाडीनगर, जिल्हा धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गुन्ह्यातील कारही कळंबमध्ये बेवारस अवस्थेत
या कारवाईदरम्यान गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची मोबिलो कार (MH 43 AR 4070) कळंब शहरात बेवारस अवस्थेत आढळून आली. कारची नंबर प्लेट काढण्यात आलेली होती. तपासात वाहनाचा क्रमांक MH 43 AR 4070 असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी हे वाहनही मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबचे पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलीस हवालदार महादेव मुंडे, पोलीस हवालदार अजीज शेख आणि महिला पोलीस अंमलदार सपना गिते यांच्या पथकाने केली.

0 Comments