/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> २४ वर्षे तिरंग्याची शान जपून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात जल्लोषात गौरव!

Hot Posts

२४ वर्षे तिरंग्याची शान जपून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात जल्लोषात गौरव!

 

२४ वर्षे तिरंग्याची शान जपून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात जल्लोषात गौरव! 


‘वर्दीचा सन्मान... तिरंग्याचा अभिमान!’च्या जयघोषात भव्य रॅली; युवकांना दिले ‘प्रत्येक घरात एक सैनिक’ घडवण्याचे आवाहन

पंढरपूर : देशसेवेसाठी आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे ३० दिवस समर्पित करून भारतीय सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेले पंढरपूरचे सुपुत्र हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे मायभूमीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘वर्दीचा सन्मान... तिरंग्याचा अभिमान!’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यामुळे पंढरपूर शहराचे वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले.

६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून भव्य रॅलीला सुरुवात झाली. स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भक्ती मार्ग परिसरातून रॅली मार्गस्थ झाली. नागरिक, युवक, माजी सैनिक, अधिकारी, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय!’ आणि ‘वंदे मातरम्!’ अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

यानंतर गाडगेबाबा चौक येथील विराट मंगल कार्यालयात हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. मान्यवर, माजी सैनिक, अधिकारी, नागरिक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कार सोहळ्याने उपस्थितांच्या भावनांना उधाण आले.

२४ वर्षांची प्रदीर्घ आणि अभिमानास्पद देशसेवा

२ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्य दलातील ‘कोर ऑफ सिग्नल’मध्ये दाखल झालेल्या विक्रम नाईकनवरे यांनी २४ वर्षे देशसेवा केली. आपल्या सेवाकाळात त्यांनी देशाच्या विविध भागांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पंजाब येथे अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच ड्रिल इन्स्ट्रक्टर आणि डब्ल्यू.टी. उस्ताद म्हणून जवानांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांनी प्रभावीपणे सांभाळली.

हिमाचल प्रदेश, गोवा, पंजाब यांसह देशातील विविध ठिकाणी त्यांनी जबाबदारीची पदे भूषवून कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे, सैन्यसेवा सांभाळत असतानाच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नव्याने सैन्यात दाखल होणारे रिक्रूट, अग्निवीर आणि ज्युनिअर लीडर यांना लष्करी प्रशिक्षण देण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.

सीमेवर देशाचे रक्षण करण्याबरोबरच भावी जवान घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या या सैनिकाचा पंढरपूरकरांनी केलेला गौरव उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.

‘प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे’

सत्काराला उत्तर देताना हवालदार विक्रम नाईकनवरे भावूक झाले. आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादामुळेच देशसेवेचे हे खडतर कर्तव्य यशस्वीपणे पार पाडता आले, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना देशसेवेकडे वळण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रातील युवकांना माझे आव्हान आणि नम्र विनंती आहे की, प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे. जय हिंद!” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

कुटुंबीयांच्या योगदानाचीही केली आठवण

देशसेवेच्या काळात कुटुंबीयांनी दिलेल्या मोलाच्या साथीबद्दलही नाईकनवरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपण सीमेवर कर्तव्य बजावत असताना नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी आणि संपूर्ण परिवाराने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. त्यांच्या या सहकार्यामुळेच आपण निर्धास्तपणे देशसेवा करू शकलो, असे त्यांनी सांगितले.

या गौरव सोहळ्याचे आयोजन त्यांचे बंधू दीपक राजाराम नाईकनवरे, स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था, संतपेठ पंढरपूर तसेच पंढरपूर-मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

सोहळ्यास मोठ्या संख्येने माजी सैनिक, अधिकारी, नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. २४ वर्षे तिरंग्याची शान जपणाऱ्या या वीर सुपुत्राचा पंढरपूरकरांनी केलेला गौरव हा केवळ एका सैनिकाचा सत्कार नसून, सैनिकांच्या त्यागाला आणि देशसेवेला दिलेली मानवंदना ठरली.

स्नेहभोजनाने या शानदार गौरव सोहळ्याची सांगता झाली.बालाघाट न्युज टाइम्स साठी संपादक राजगुरु साखरे पंढरपुर सोलापुर 

वर्दी उतरली... पण देशसेवेची भावना कायम राहिली!
जय हिंद!

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>