/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापुरात अग्निशमन सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह; नगरसेवकांची स्वतंत्र चौकशीची मागणी

Hot Posts

तुळजापुरात अग्निशमन सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह; नगरसेवकांची स्वतंत्र चौकशीची मागणी

 

तुळजापुरात अग्निशमन सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह; नगरसेवकांची स्वतंत्र चौकशीची मागणी

नवरात्राच्या तोंडावर अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याचा आरोप; घराला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू झाल्याने प्रशासनाला निवेदन

तुळजापूर (प्रतिनिधी) : तुळजापूर शहरात घराला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्यामुळे घटनास्थळी पोहोचूनही आग विझविण्यास प्रभावीपणे मदत करता आली नाही, असा गंभीर आरोप तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी करून मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये तुळजापूर शहरातील अग्निशमन व्यवस्थेबाबत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

निवेदनानुसार, तुळजापूर शहरातील एका घराला आग लागल्याची गंभीर दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी तुळजापूर नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले; मात्र अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्यामुळे आग विझविण्यास अपेक्षित प्रभावी मदत करता आली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

नवरात्राच्या काळात मोठ्या गर्दीचे आव्हान

तुळजापूर शहरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून लाखो भाविक दाखल होतात. शहरातील अरुंद रस्ते, मोठी गर्दी आणि विविध ठिकाणी होणारी वाहतूक यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

अशा परिस्थितीत अग्निशमन वाहन नादुरुस्त असणे ही गंभीर बाब असून, नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अग्निशमन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे आवश्यक आहे, असे नगरसेवकांनी निवेदनात म्हटले आहे.

नगरसेवकांच्या प्रशासनाकडे १३ प्रमुख मागण्या

नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या केल्या असून, त्यामध्ये संबंधित दुर्घटनेची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी करण्याबरोबरच अग्निशमन वाहनाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याची तात्काळ तांत्रिक स्थिती तपासण्यात यावी, तसेच दुसरे अग्निशमन वाहन तीन महिन्यांपासून नादुरुस्त असल्यास त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच दोन्ही अग्निशमन वाहनांची लॉगबुक, दुरुस्ती, सर्व्हिस रेकॉर्ड आणि तांत्रिक तपासणी अहवाल तपासण्यात यावा. वाहन नादुरुस्त असल्याची माहिती मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना कधीपासून होती, याचीही चौकशी करण्याची मागणी आहे.

याशिवाय वाहन नादुरुस्त असताना पर्यायी अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती किंवा नाही, याची चौकशी करावी. मुख्याधिकारी म्हणून अग्निशमन सेवा कार्यान्वित ठेवण्याबाबत संबंधितांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

दोषी आढळल्यास कारवाईची मागणी

चौकशीत मुख्याधिकारी किंवा अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर अथवा प्रशासकीय दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास, त्यांच्या विभागानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच आगीच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना झालेल्या नुकसानीचा विचार करून, त्यांना तातडीने आर्थिक मदत अथवा शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नवरात्रापूर्वी अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याची मागणी

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी तुळजापूर नगरपरिषदेची संपूर्ण अग्निशमन व्यवस्था तातडीने दुरुस्त करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सदर चौकशी व करण्यात आलेल्या कारवाईची माहिती नगरसेवकांना लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, आनंद नानासाहेब जगताप, रणजित चंद्रकांत इंगळे, अक्षय धनंजय कदम आणि सौ. प्रगती गोपाळ लोंढे यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी व आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>