चिवरी येथील युवा शेतकऱ्याने पाच एकर सोयाबीनवर फिरवला रोटावेटर! बियाणे, खत व मशागतीचा खर्चही निघणार नसल्याने युवा शेतकऱ्याचा हताश निर्णय
चिवरी (प्रतिनिधी)/बिभीषण मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असला, तरी तो पिकांच्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प ठरला आहे. पावसाअभावी शेतजमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून उडीद, मूग, सोयाबीन, तूर आणि मका यांसारखी खरीप पिके अक्षरशः करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची वाढ खुंटली असून शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पिके वाळून गेली आहेत. काही ठिकाणी एकरी क्विंटलभरही उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याने पीक काढणीचा खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादन घेण्यापेक्षा काढणीचा खर्च अधिक होणार असल्याने काही शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
चिवरी येथील युवा शेतकरी रमेश प्रकाश झिंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पाच एकर क्षेत्रातील उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवून पीक जमीनदोस्त केले. वेळेवर पेरणी करूनही पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दगा दिल्याने सोयाबीन डोळ्यादेखत वाळू लागले. बियाणे, खते, औषधे तसेच मशागतीसाठी केलेला खर्च मोठा असतानाही पिकातून अपेक्षित उत्पादन मिळण्याची कोणतीही शक्यता उरली नाही.
पीक काढणीचा खर्चही वसूल होणार नसल्याने अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर चालवून उभे सोयाबीन जमिनीत गाडण्याचा निर्णय झिंगरे यांनी घेतला. अनेक दिवस मेहनत करून वाढवलेले पीक स्वतःच्या डोळ्यांसमोर नष्ट करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींची तीव्रता या घटनेतून स्पष्ट होत आहे.
चिवरीपुरतेच हे संकट मर्यादित नसून तुळजापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अशीच अवस्था झाल्याचे चित्र आहे. काही शेतकरी अत्यंत जड अंतःकरणाने उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवत आहेत, तर काही ठिकाणी पिके पूर्णपणे वाळल्याने शेतकऱ्यांनी ती जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडून दिली आहेत.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, पेरणी आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र ऐन पीक वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने या सर्व खर्चावर पाणी फेरले आहे. उत्पादन हातात येण्याआधीच पीक नष्ट करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत.
पावसाअभावी उभे पीक नष्ट करण्याची वेळ आलेले चिवरीतील हे चित्र खरीप हंगामातील संकटाची तीव्रता अधोरेखित करणारे असून, याप्रकरणी शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.

0 Comments