नळदुर्गमध्ये श्री जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी; कुलूप तोडून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास!
धाराशिव (प्रतिनिधी) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील वसंतनगर परिसरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील चॅनल गेटचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते ७.५५ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. वसंतनगर येथील श्री जगदंबा देवीच्या मंदिरातील गाभाऱ्याच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे सेवन पीस, पाच वाट्यांचे गंठण आणि सोन्याचे मणी, असे एकूण ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रवि माणिक राठोड (वय ३३, रा. वसंतनगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या चोरीप्रकरणी पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

0 Comments