वडगाववाडीत शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग; दीड लाखांचे नुकसान
लोहारा तालुक्यातील घटना; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
लोहारा (प्रतिनिधी) : लोहारा तालुक्यातील वडगाववाडी शिवारात शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लावून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाववाडी येथील शेतकरी लक्ष्मण नामदेव बोडके (वय ५०) यांच्या शेतातील गट क्रमांक ९२ मध्ये सोयाबीनची गंजी ठेवण्यात आली होती. दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान या सोयाबीनच्या गंजीला आग लावण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे. या आगीत बोडके यांच्या शेतातील अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोयाबीन जळून नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी लक्ष्मण नामदेव बोडके यांनी दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा शिवाप्पा कापसे, गणपती विश्वनाथ बोडके आणि सुंदरबाई गणपती बोडके (सर्व रा. वडगाववाडी, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६(एफ), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहेत.

0 Comments