नळदुर्गमध्ये अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल; लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी खळबळ
अल्पवयीन असताना विवाह लावून दिल्याचा आरोप; पीडितेने दोन अपत्यांना दिला जन्म, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंद
नळदुर्ग, प्रतिनिधी : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याच्या तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित तरुणासह बालविवाहाशी संबंधित बाबींची कायदेशीर चौकशी होण्याची शक्यता असून, परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असताना तिच्या नातेवाइकांनी एका तरुणासोबत तिचा विवाह लावून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर पुन्हा शारीरिक संबंधांमुळे तिने दुसऱ्यांदा एका मुलीला जन्म दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडितेने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(२)(एम), बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९ व १० तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

0 Comments