अल्पवयीन मुलीचा विवाह लावून लैंगिक अत्याचार; पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल- तुळजापूर तालुक्यातील घटना
धाराशिव : अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगी सध्या पाच महिन्याची गर्भवती असून तिच्या वैद्यकीय जबाबाच्या आधारे पतीसह विवाह लावून देणाऱ्या नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी (वय १७ वर्ष) अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या नातेवाईकांनी १ मे २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तिचा विवाह गावातीलच एका तरुणाशी लावून दिला. विवाहानंतर संबंधित तरुणाने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
काही दिवसांनंतर मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब समोर आली. वैद्यकीय तपासणीदरम्यान ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पिडीता रुग्णालयात उपचाराधीन असताना ८ ऑक्टोबर २०२६ रोजी तिने दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली.
या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणासह विवाह लावून देणाऱ्या नातेवाईकांविरुद्ध खालील विविध कायद्यांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४(१), ६४(२)(एम), ६५(१), ३(५)
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६: कलम ९, १०, ११
बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा, २०१२: कलम ४(१), ६(१)
पोलीस या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.

0 Comments