कोयत्याचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण -GPS लोकेशनच्या मदतीने कळंब पोलिसांची धडाकेबाज कारवाई! अपहरणकर्त्यांच्या तावडीतून २३ वर्षीय तरुणीची सुटका; पोलीस हवालदार गणेश वाघमोडे यांची धाडसी कामगिरी
कळंब : घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करीत कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना ६ नोव्हेंबर २०२६ रोजी घडली. या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. वाहनातील GPS लोकेशनच्या आधारे पोलिसांनी थेट अंबाजोगाई गाठत एका खदानीजवळ अपहरणकर्त्यांचा माग काढला. यावेळी तरुणीला मारण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलीस हवालदार गणेश वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखत आरोपीवर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. कळंब पोलिसांच्या या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागिणी रमेश कानगे (वय २३, रा. बोर्डा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्या फिर्यादीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अभिजित ऊर्फ तन्या अर्जुन नवाट (रा. कोठाळवाडी), किरण भागवत तुपारे (रा. बोरगाव, ता. कळंब), अजय रामकिसन माने (रा. परळी रोड बायपास, कळंब) व अन्य एका इसमाने संगनमत करून त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत त्यांना एमएच २० डीव्ही ०३५७ क्रमांकाच्या इर्टिगा वाहनातून जबरदस्तीने घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी रागिणी कानगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०(१), ७४, ३३३, ३५२, ३५१(३), ३(५), शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
GPS लोकेशन ठरले पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा
गुन्हा दाखल होताच कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक अपहृत तरुणीचा शोध घेण्यासाठी तातडीने रवाना झाले. आरोपींच्या वाहनाचा पाठलाग सुरू असताना पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी वाहनातील GPS यंत्रणेची माहिती मिळवून त्याचे लोकेशन सातत्याने शोध पथकाला दिले. या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अंबाजोगाई (जि. बीड) येथील एका खदानीजवळ संबंधित वाहनाचा ठावठिकाणा शोधून काढला.
तरुणीचा जीव वाचवण्यासाठी पोलीस हवालदाराची धाडसी झेप
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, वाहनामध्ये आरोपी अपहृत तरुणीला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस हवालदार क्रमांक १४६७ गणेश वाघमोडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अत्यंत शिताफीने आरोपीवर झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या धाडसी हस्तक्षेपामुळे तरुणीचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस उपनिरीक्षक सिराज पठाण, पोलीस हवालदार गणेश वाघमोडे (१४६७), पोलीस नाईक भाऊसाहेब पोळ (१४६५), पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर कदम (४८५), आसाराम खाडे (८३२) आणि अनिल भोसले (१७७७) यांनी सहभाग घेतला.
GPS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पोलिसांची तत्परता आणि पोलीस हवालदार गणेश वाघमोडे यांचे प्रसंगावधान यामुळे अपहरणाच्या गंभीर प्रकरणात पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले. या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments