नंदगावमध्ये २४ एकरांतील सोयाबीनच्या बनीमला अज्ञात व्यक्तीकडून आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान!-Naldurg Police Station Crime News
रात्रीच्या सुमारास लावली आग; दत्तात्रय येणगुरे यांची नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव शिवारात अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या बनीमला आग लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत तब्बल २४ एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या बनीम जळून खाक झाल्याने शेतकरी दत्तात्रय सोमन्ना येणगुरे यांचे अंदाजे ११ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सोमन्ना येणगुरे (वय ५८, रा. नंदगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांची नंदगाव शिवारातील गट क्रमांक ५६१ व ५२४ मध्ये शेती आहे. या शेतातील सुमारे २४ एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या बनीमला दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावून दिली.
या आगीत शेतातील सोयाबीनच्या बनीम जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट आणि अपेक्षित उत्पन्न आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
या प्रकरणी दत्तात्रय येणगुरे यांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२६(एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय, आग कोणी लावली आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.
शेतातील सोयाबीनच्या बनीमला आग लावल्याने ११ लाखांचे नुकसान झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

0 Comments