गावगाड्यात दिवाळी पूर्वीच राजकीय फटाके फुटणार, राज्यातील २३५९ ग्रामपंचातींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू
मुंबई – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दि,३ ऑक्टोंबर रोजी घोषित केला आहे . राज्यात दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटणार आहेत . यामध्ये राज्यातील 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाच नोव्हेंबरला मतदान होईल तर 7 नोव्हेंबरला मतमोजणी (vote count) होणार आहे . या निवडणुकांत राजकीय पक्षांचा कस लागणार असून पुढील निवडणुकींच्या मोर्चे बांधण्यासाठी अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवणे जिकरीचे ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच 2950 सदस्यापदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. 5 नोव्हेंबर 2023 रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ( gram panchayat elections 2023)
आचारसंहिता लागू –
निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे की, सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून मंगळवार (दि. 3 ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधित नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 23 ऑक्टोबरला होईल. 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
25 ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख 5 नोव्हेंबर असणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. तर 7 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
राजकीय पक्षांचा कस लागणार
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नवरात्रीपासूनच या निवडणुकांच्या कार्यक्रमाची रणधुमाळी सुरू होणार आहे. 16 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल तर दिवाळी पूर्वीच म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन सात नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पदासाठी थेट निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.
नवीन राजकीय समीकरणे
ग्रामपंचायत निवडणूक थेट राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी राजकीय पक्षांचा त्यातील सहभाग लपून राहिलेला नाही. राज्यातील यापूर्वी झालेल्या निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा झाल्या होत्या. यावेळी देखील लढत तशाच होणार असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीत सहभागी झाला आहे. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. नवीन मित्र पक्ष एकमेकांना कसे सांभाळून घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अनेकांची प्रतीक्षा संपली
मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासकाकडून कारभार पाहिला जात होता. त्यामुळे काही प्रमाणात विकासाला देखील खिळ बसल्याचे चित्र होते. तर निधी असून देखील विकास कामे होत नसल्यामुळे गावागावात वादाचे प्रसंग उद्भवत होते. निवडणुका जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा गावगाड्यातील वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
0 Comments