जि.प. सेस 2023-24 अंतर्गत बायोगॅस संयंत्र वाटप योजना लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्याचे जिल्हा विकास अधिकारी राठोड यांचे आवाहन
धाराशिव,दि.6(जिमाका) जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जि.प.सेस सन 2023-24 अंतर्गत बायोगॅस संयंत्र वाटप करणे (वैयक्तीक लाभ) या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.त्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी लाभार्थ्यांकडे आवश्यक असणारी जागा उपलब्ध असावी.संबंधित लाभार्थीकडे कमीत कमी 2 जनावरे असावेत.अर्ज करतांना पुढील कागदपत्रे सोबत जोडावी.विहित नमुन्यातील लाभार्थी मागणी अर्ज (पं.स.स्तरावर उपलब्ध),आधारकार्ड, आधारकार्ड संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते,सातबारा,आठ अ,जनावरे असल्याची ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी अनुदानाची रक्कम 6 हजार 500 रुपये आहे.विहित नमुन्यात संपूर्ण माहिती भरुन संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समितीकडे सादर करावेत.
बायोगॅस उभारणीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.बायोगॅस पारंपरिक इंधनाला उत्तम पर्याय आहे. बायोगॅस निर्मिती बरोबरच चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते. महिलांची धुराच्या त्रासापासून मुक्ती होते.गॅस सिलेंडर टंचाईवर उत्तम पर्याय आहे.हरितगृह वायुचे उत्सर्जन कमी करुन वायु प्रदूषण रोखण्यास मदत होते.ग्रामीण भागात मानवी विष्टेच्या मलनि:स्सारणाचा उत्तम मार्ग. आरोग्यविषयक समस्यांपासून सुटका. उत्तम कंपोस्ट खतामुळे रोगजंतू व तनाच्या बियांपासून होणारा प्रसार रोखण्यास मदत.प्रती महिना 2 गॅस सिलेंडरची बचत (1 हजार 850 रुपयांची बचत होऊ शकते) अथवा 200 ते 250 रुपये लाकडाची बचत व पर्यायाने निसर्गाचे संरक्षण आदी फायदे होतात.
संयंत्राची निगा व देखभालीसाठी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागते.2 घ.मी. आकाराच्या संयंत्रासाठी 4 ते 5 टोपली किंवा 50 किलो शेण दररोज टाकावे. जितके शेण असेल तितकेच पाणी मिसळून सयंत्रामध्ये सोडावे. थंडीच्या दिवसांत शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा.गॅस टाकी संयंत्रामध्ये अर्धी डावीकडे व अर्धी उजवीकडे उलट-सुलट फिरवून तसेच संयंत्राच्या निकास कक्षातून पाचक यंत्रामध्ये बांबू घालून तो फिरवून शेणावरील जमा होणारी साय ढवळावी.घुमटाला नेहमी मातीने झाकून ठेवावे.शौचालय जोडलेला असल्यास शौचालय स्वच्छ करतांना फिनेल,जंतू नाशके,साबण-सोडा आदी पदार्थांचा वापर करु नका. राखेने शौचालय स्वच्छ करावे.गेट व्हॉल्व शेगडी कॉक यांच्यावर मधून मधून खोबरेल तेल टाकावे.खताचा उखंडा नेहमी 2 ते 3 फुटापेक्षा जास्त खोल करु नये. जर आपले संयंत्र नादुरुस्त झाल्यास तात्काळ आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी पंचायत समिती व कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी.जी.राठोड यांनी केले आहे.
0 Comments