धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - धनगर समाजास एसटीचे आरक्षण देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी ऍड खंडेराव चौरे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.२१ नोव्हेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्वात आहे. डोंगर दऱ्यात राहणारे, भटकंती करुन उपजिवीका भागवणारे धनगर बांधव आजही विकासपासून वंचित आहेत. कित्यके पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत. भारतीय राज्य घटनेने आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली. आज तुमच्या हाती धनगर उध्दाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले. जिल्ह्यापासून ते गाव खेड्यांपर्यंत आंदोलनाचे लोण पसरले होते. या अनुषंगाने आपण एक बैठकी घेतली. या बैठकीत मी धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठीचे पुरावे मांडले.
धनगर समाजाच्या उध्दारासाठी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबईच्यावतीने धनगर आरक्षणासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत (याचिका क्र. ४९१९/२०१७) ऍड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करण्यात यावी. तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणीसाठी अर्ज दाखल करण्यात यावा. तर मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करुन योजना कार्यान्वित करण्यात यावी व स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करणे. तसेच हे अदिवासींना ते धनगरांना, याप्रमाणे घोषित केलेल्या १ हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत. तर संपूर्ण निधी देखील उपलब्ध झाला नसल्यामुळे आढावा घेऊन उपाययोजना करण्यात यावी. तसेच मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देण्यात यावे. त्याबरोबरच महसूल रेकॉर्डमधील आरक्षीत चराई कुरणे दर आकारणी करुन स्थानिक मेंढपाळांना वाटप करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर दिगंबर मैंदाड, धनंजय शिंगाडे, मुकुंद फुले, तानाजी बंडगर, ऍड श्रीकांत मैंदाड, धनाजी सातपुते, रामहरी सुतार, लिंबराज डुकरे, ऍड मनीष वाघमारे, श्याम तेरकर, गणेश एडके, बालाजी वगरे, गणेश एडके, प्रवीण पवार, सचिन चौरे, सुरज तांबे, अमोल भोजने, सुरज शिंदे, अचितराव शिंदे, गणेश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments