धाराशिव : रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन
धाराशिव,दि.28 : जिल्ह्याचे रब्बी ज्वारी पीक पेरणीचे एकूण 1 लक्ष 81 हजार 427 हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. जिल्ह्यातील काही भागात रब्बी ज्वारी पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे क्षेत्रीय भेटी दरम्यान निदर्शनास आले आहे. ही किड बहुभक्षी प्रकारची असल्याने नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या पुढील कालावधीत या किडीचा पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.
या अळ्या पिकाची पाने खाऊन पिकाचे आतोनात नुकसान करतात. नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खातात त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. ज्वारीच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. जुनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त मध्य शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते. पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते. मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. त्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने किडींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजनांचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा :
मशागतीय पद्धती: हंगाम संपल्यावर पिकाच्या अवशेषाची विल्हेवाट लावावी.जमिनीची खोल नांगरट करावी. पेरणी वेळेवर करावी. टप्प्याटप्प्याने पेरणी टाळावी. ज्वारी पिकाभोवती नेपियर गवताच्या तीन ते चार ओळी लावावे. हे गवत सापळापीक म्हणून कार्य करते. वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. रासायनिक खताचा अतिरेक वापर टाळावा.
जैवीक पद्धती: ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टिलेनोमस यांची परोपजीवीग्रस्त पन्नास हजार अंडी प्रती एकर एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडावे. रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जीवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
भौतिक पद्धती: पीक 30 दिवसाचे असल्यास बारीक वाळू व चुन्याचे 9:1 प्रमाण करून पोंग्यात टाकावे.
यांत्रिक पद्धती: मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी 15 कामगंध सापळे प्रती एकरी लावावेत.
रब्बी ज्वारी पिकाच्या रोपावस्था ते सुरवातीची पोंग्याची अवस्था (अंडी अवस्था) या कालावधीमध्ये 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास पिकावर 5 टक्के निबोंळी अर्क किंवा 50 मिली अझाडीरॅक्टीन (1500 पीपीएम) प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था (दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या )या कालावधीमध्ये 10 ते 20 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास 4 ग्रॅम इमामेक्टीन बेंझोएट ( 5 टक्के डब्ल्युएजी) किंवा 3 मिली स्पिनोसॅड (45 टक्के एससी) किंवा 5 मिली थायामिथॉक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेडसी किंवा 4 मिली क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एससी प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेवटच्या अवस्थेतील अळ्या या कालावधीमध्ये विषारी अमिषाचा वापर करावा.यासाठी दहा किलो साळीचा भुसा व 2 किलो गुळ 2-3 लिटर पाण्यात मिसळून 24 तास सडण्यासाठी ठेवावे. या द्रावणाचा वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये 100 ग्रॅम थायोडीकार्ब 75 डब्ल्युजी मिसळावे व हे आमिष पोंग्यामध्ये टाकावे.
अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक,मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
0 Comments