चिवरी येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड, अत्यल्प दर, वाढता खर्च भीषण दुष्काळ यामुळे टोकाचे पाऊल
चिवरी : मागील वर्षभर सुरू असलेला निसर्गाचा लहरीपणा आणि भीषण दुष्काळ संकट ,अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महागडी औषधं, खते, फवारणी खर्च व मजुरी वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे वैतागून शेतकरी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवू लागले आहेत.यावर्षीच्या भीषण दुष्काळाचा फटका परिसरातील द्राक्ष बागायतदारांना बसला असून, द्राक्षबाग जोपासण्यासाठी येथील शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. निसर्गाचा लहरीपणा, गडगडलेले बाजार भाव, भीषण दुष्काळामुळे पाण्याचा मेळ बसत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शेतकरी दत्ता विजय बनसोडे यांनी दीड एकर क्षेत्रावर असलेल्या द्राक्ष बागेतील झाडांवर थेट कुऱ्हाड चालवून उभी असलेली द्राक्ष बाग आडवी केली आहे. तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागेवर अखेर काळजावर दगड ठेवून कुऱ्हाड चालवून ही बाग मोडीत काढली आहे .अशी परिस्थिती दर वर्षी कायम राहिली तर द्राक्ष उत्पादकांनी कसे जगायचे, केलेला वारेमाप खर्च वसूल होईल का? असे अनेक प्रश्न उत्पादकांना सतावत आहेत. उत्पन्नाअभावी घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. मेहनत घेऊन निसर्गापुढे हतबल होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या लोकसभा प्रचार रणधुमाळीत दंग झालेले उमेदवार, मताचा जोगवा मागण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत मात्र शेतकऱ्यासमोर उभे ठाकलेले भीषण दुष्काळ संकट दिसत नाही का? शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही? असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
शेतात बाग लावून गेली चार-पाच वर्षे झाली. यंदा भीषण दुष्काळामुळे द्राक्ष बागेला पाणी मिळत नसल्याने, दीड एकर क्षेत्रावर मी कुऱ्हाड चालवली आहे .खर्च जास्त आणि उत्पन्न कमी निघत असल्यानं चिंता वाढली आहे. द्राक्ष बागेसाठी घेतलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे तीन लाख रुपये कर्ज आहे ते आता कसे फेडायचे असा प्रश्न सतावत आहे, तरी शासनाने आम्हा द्राक्ष बागायतदारांना दुष्काळी उपाययोजनाची मदत करावी.
दत्ता बनसोडे शेतकरी चिवरी.
0 Comments