दहावीत १० वेळा नापास तरीही बापाची जिद्द कायम, पण ११ व्या प्रयत्नात पठ्ठ्या फुल्ल पास
बीड : आपण सर्वांनीच दहावीची परीक्षा दिली असेल. यातील अनेकजण पहिल्याच परीक्षेत पास झालेही असतील, तर काहीजण पहिल्यांदा नापास होत किमान दुसऱ्यांदा तरी पास झालेच असतील. पण, बीड जिल्ह्यात असा १ पठ्ठ्या आहे जो दहावीत तब्बल १० वेळा नापास झालाय. राज्यातील दहावीचा निकाल सोमवारी २७ मे रोजी जाहीर झालाय. यावेळीही निकालात मुलींनीच बाजी मारली. यंदाही निकालात कोकण विभाग अव्वल आलाय. हे सर्व खरं असलं तरी चर्चा मात्र बीडच्या एका 'टॅलेंट बॉय'ची सुरू आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील विद्यार्थी तब्बल १० वेळा दहावीला नापास झाला पण यावेळी तो मात्र उत्तीर्ण झालाय. कोणत्याही परिस्थितीत अन् काहीही झालं तरी आपल्या मुलाला पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची, अशी जिद्द पालकांनी धरली होती. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ११ व्या प्रयत्नात या विद्यार्थ्यानं अखेर 'मॅजिक सक्सेस' मिळवलं आहे. या गोष्टीचा त्याच्या कुटुंबियांनाच नाही तर अख्ख्या गावाला आनंद झाला आहे.
पास होईपर्यंत दिली परीक्षा.
परळी तालुक्यातील डाबी या गावचे रहिवासी असलेल्या सायनस उर्फ नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा २०१८ या वर्षात दहावीला होता. २०१८ ची दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो या २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालाय. वडील सायनस उर्फ नामदेव मुंडे हे अगदी सर्वसामान्य कामगार आहेत. संपूर्ण जीवन अतिशय कष्टात व बांधकामावर कामगार म्हणून काम करण्यात त्यांनी घालवलं. काहीही झालं तरी आपला मुलगा दहावी पास झाला पाहिजे, ही मनोमन इच्छा त्यांच्या मनात होती. त्यामुळं 'नापास झालं तरी हरकत नाही, तू पास होईपर्यंत परीक्षा देत राहा' असं म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली.
गावकऱ्यांचा जल्लोष.
तब्बल १० वेळा नापास झाल्यानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अकराव्या प्रयत्नात कृष्णाला अखेर 'जादुई यश' मिळालं. या यशानं वडील सुखावून गेले असून, त्यांना आपले आनंदाश्रूही रोखता आले नाहीत. एवढंच नाही तर अख्ख्या गावाला या यशाचा इतका आनंद झाला आहे की, कृष्णानं उत्तुंग यश मिळवल्यासारखं अभिनंदन त्याचं संपूर्ण गाव करत आहे. अकराव्या प्रयत्नात दहावी पास होणाऱ्या कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन गाव आनंद व्यक्त करत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला कृष्णा एकप्रकारे सद्यस्थितीला हिरो बनला आहे.
भावाची जिल्ह्यात जोरदार चर्चा
दहावीच्या निकालात १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतूक केलं जातं. मात्र, १० वेळा सर्वच विषयात नापास होऊन ११व्या प्रयत्नात ‘मॅजिक सक्सेस’ गाठणाऱ्या कृष्णाचं सर्वच स्तरातून विशेष कौतूक होत आहे. दहावी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळण्यासाठी यंदा जणू स्पर्धाच सुरु होती. जिल्ह्यात तब्बल ८५ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. मात्र, परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी या गावात निकालाचा आगळावेगळा आनंद साजरा केला जात आहे. कृष्णा हा टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या यशाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.
वडिलांनी दिलं कृष्णाला प्रोत्साहन
याबाबत डाबी येथील गावकऱ्यांनी सांगितलं की, कृष्णाची घरची परिस्थिती अगदी बेताची असून, आईवडिल दोघेही मजुरी करतात. कृष्णाही मजूरीची छोटी मोठी कामे करतो. शाळेतील परीक्षेचे शुल्क भरण्यासाठीही त्यांच्याकडं पैसे नसायचे, तरीही त्याच्या वडिलानी जिद्द सोडली नाही. परीक्षेच्या काळातही पेपर संपल्यानंतर तो वडिलांसोबत मजुरी करत होता. नियमित कामाला जात असल्यामुळं आपण परीक्षा देवू शकणार नाही, असं त्यानं वडिलांना सांगितलं होतं. पण, वडिलांनी त्याला सतत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आज तो अखेर उत्तीर्ण झाला असुन सध्या मित्रांकडून त्याच्या गुणपत्रकाचा फोटो व्हायरल करुन कौतूक केलं जात आहे.
0 Comments