राज्यातील रेशन दुकानातून ऑफलाइन धान्य देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश; सर्वर डाऊनचा फटका
मुंबई :मागील काही महिन्यापासून ऑनलाइन समस्यांमुळे त्रस्त झालेल्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागणीनंतर आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ऑफलाइन धान्य वितरणाचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणाऱ्या नागरिकांना बायोमेट्रीक हजेरी आवश्यक आहे. त्यासाठी पुरवठा विभागाने रास्त भाव दुकानांमध्ये फोर-जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविले आहेत. गेल्या दोन दिवसापासून ई-पॉस मशीनवर धान्य वाटपासाठी तांत्रिक अडचणामुळे सर्वर डाऊन चा समस्या निर्माण होत होती यामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये वाद निर्माण होत होते, यामुळे एकंदरीत ग्राहकास धान्य दुकानदारांना या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे.
राज्यात काही दिवसांपासून रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. या तांत्रिक समस्येमुळे अन्न-धान्य वितरण ऑफलाइन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली होता.
या मागणीचा विचार करून नागरिकांना तातडीने रेशनचा लाभ देण्यासाठी आपण ऑफलाइन पद्धतीने रेशनचे वाटप करावे, याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला आदेश दिले होते. सर्वरमध्ये झालेल्या समस्येमुळे राज्यातील अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी तातडीने विभागाची बैठक घेऊन ऑफलाइन धान्य देण्याचे आदेश जारी केले आहेत.
''कितीही तांत्रिक समस्या विभागापुढे निर्माण झाल्या तरी राज्यातील एकही नागरिक हा धान्यापासून वंचित राहणार नाही. नेहमीप्रमाणेच प्रत्येक नागरिकाच्या घरात धान्य पोचवले जाईल.''- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
0 Comments