Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा व लोहारा तालुक्यातील समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा 17 सप्टेंबरला उपोषण : सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी

उमरगा व लोहारा तालुक्यातील समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा 17 सप्टेंबरला उपोषण : सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी

धाराशिव प्रतिनिधी : उमरगा शहरासह उमरगा व लोहारा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या व अन्य नागरिकांच्या जिवाळ्याशी निगडित मूलभूत समस्या तात्काळ सोडवण्याचे लेखी निवेदन उमरगा लोहारा विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गणेश पवार व उमरगा लोहारा विभागाचे पोलीस उपाधीक्षक सदाशिव शेलार यांना दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

 निवेदनात असे नमूद आहे की उमरगा लोहारा तालुका गत 15 वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. उमरगा लोहारा तालुक्याला लोकप्रतिनिधी आहे का नाही ? नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत असून त्यांच्या हालआपेष्टा सहन करण्याचा अंत झाला आहे. याची दखल घेऊन दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष ( कॅबिनेटमंत्री दर्जा ) ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी प्रशासनास लेखी निवेदन दिले आहे, निवेदनात पुढील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे.

उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध समस्या पुढील प्रमाणे.

1) उमरगा शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था करावी.

2) शहरातील विविध भागातून गटारीचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने ते  पाणी रस्त्यावर साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बंदिस्त गटारी करून पाण्याची विल्हेवाट लावावी.

3) उमरगा शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत त्या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी.

4) उमरगा शहरांमध्ये व संपूर्ण उमरगा व लोहारा तालुक्यामध्ये विजेचा सतत लपंडा होत असतो. सतत वीज जाण्याने नागरिकांना डासांचा त्रास होत असून चोऱ्यांचे प्रमाणही अफाट वाढले आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणार नाही याची सूचना संबंधित विभागाला द्यावी.

5) शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेतीसाठी दिवसा बारा तास अखंडितपणे वीज पुरवावी जेणेकरून पिकांना पाणी तर देता येईलच शिवाय दिवसा लाईट चालू राहिल्यामुळे रात्रीचा धोका टळेल.

6) उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांना सिबिल स्कोर चांगला नाही म्हणून पीक कर्ज दिले जात नाही. कोणत्या बँका कर्ज देत नाहीत त्या बँकांच्या शाखाधिकार्‍यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांचे पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्याविषयी आदेशित करावे.

7) उमरगा शहरांमध्ये पावसाळ्यामुळे अनावश्यक गवत भरमसाठ वाढले आहे त्याचे तात्काळ निर्मुलन करण्यात यावे. 

8) घाणीमुळे गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन नुकतेच दोन बालकांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला, याचे गांभीर्य लक्षात घेऊन डासांचा नायनाट करण्यासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावात तात्काळ धूर फवारणी करावी.

9) उमरगा व लोहारा शहरातील मोकाट जनावरांचा वाहतुकिला अडथळा तर होत आहेच शिवाय झाडांची नासधुसही होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे त्यांना गोशाळेमध्ये दाखल करा  किंवा अन्यत्र व्यवस्था करावी.

सदर समस्या 16 सप्टेंबर 2024 पर्यंत नाही सोडवल्यास आम्हास नाईलाजास्तव 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उमरगा येथे लाक्षणिक उपोषणास बसणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments