Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आंदोलनांचा इशारा

चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आंदोलनांचा इशारा


चिवरी/राजगुरु साखरे  : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याचे  काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे याप्रकरणी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे. 

दैनिक पुण्यनगरी ने दिनांक 5 जानेवारी रोजी चिवरी महालक्ष्मी मंदिर रस्त्याची चाळण या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेत संबंधित विभागाने  झांबरे वस्ती ते साठवण तलाव या मंदिराच्या रस्त्याच्या कामास सुरुवात करून रस्ता दुरुस्त केला मात्र हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा केला असून, रस्ता जागोजागी उकरला आहे त्यामुळे हा रस्ता अल्प कालावधीत टिकणारा आहे.या रस्ताच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे हा रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. या रस्ता कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. या रस्त्यासाठी खडीचे प्रमाण कमी डांबराचे प्रमाण कमी, व माती मिश्रित खडी वापरण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडत आहेत.

महालक्ष्मी मंदिराचा हा महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. कोट्यवधी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले असतांना संबधीत ठेकेदार निकृष्ट साहित्य वापरून रस्त्याचे काम केले आहे आहे. रस्ता जागोजागी उकरला जात असल्याने ग्रामस्थांना पुन्हा या खड्ड्याचे धक्के खात प्रवास करावा लागणार आहे.अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू असताना स्थानिक प्रशासन मात्र कोणत्या दबावाखाली या कामाकडे दुर्लक्ष करत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे येथील ग्रामपंचायत ग्रामस्थांनी हा रस्ता नव्याने दुरुस्त करून दर्जेदार करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  महालक्ष्मी मंदिर रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा केला असून हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्यामुळे येथे नेहमी मोठ्या प्रमाणात दळणवळण होते. हा रस्ता नव्याने चांगल्या दर्जाचा बनवण्यात यावा अन्यथा आम्ही ग्रामस्थासह आंदोलन व उपोषणाला बसणार आहे याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे.

संदीप शिंदे ग्रामस्थ चिवरी.


Post a Comment

0 Comments