Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात ऊस उत्पादनात क्रांती घडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महत्वकांक्षी प्रकल्पाबाबत बैठक संपन्न

धाराशिव जिल्ह्यात ऊस उत्पादनात क्रांती घडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महत्वकांक्षी प्रकल्पाबाबत बैठक संपन्न 


धाराशिव, दि,११(प्रतिनिधी -रूपेश डोलारे)  : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, यासाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, धाराशिव जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टरहून अधिक असले तरी, सध्याची उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कृषी विज्ञान केंद्र, बारामती, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने उसातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे प्रयोग यशस्वीरित्या सुरू आहेत. या प्रयोगातून असे दिसून आले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे उत्पादनात ४०% पर्यंत वाढ, पाणीवापरात ३०% पर्यंत बचत, उत्पादन खर्चात २५ ते ३०% पर्यंत बचत, पारंपरिक पद्धतीपेक्षा ५० ते ७०% अधिक नफा आणि संभाव्य कीड व रोगांची आगाऊ माहिती असे विविध फायदे शेतकऱ्यांना मिळतात. या तंत्रज्ञानामध्ये हवामान केंद्रे आणि मातीमधील सेन्सरचा वापर करून शेतकऱ्यांना पिकांबाबत अचूक माहिती दिली जाते.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला नॅचरल शुगरचे श्री. बी. बी. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धाराशिव श्री. रविंद्र माने, जिल्हा उपनिबंधक श्री. पांडुरंग साठे, तसेच जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक आणि शेतकी अधिकारी उपस्थित होते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आजची बैठक महत्त्वपूर्ण ठरली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी  प्रति हेक्टरी २५,००० रुपये खर्च अपेक्षित आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एक लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. या खर्चापैकी VSI ९,२५० रुपये, साखर कारखाने ६,७५० रुपये आणि शेतकऱ्यांचा ९००० रुपयांचा हिस्सा असणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड 'जो आधी अर्ज करेल त्याला प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल. त्यामुळे *शेतकऱ्यांनी ज्या कारखान्यांचे ते सदस्य आहेत, त्या कारखान्यांकडे तात्काळ करारनाम्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.* हे तंत्रज्ञान १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार असल्याने, साखर कारखान्यांना शेतकरी आणि गावांच्या निवडीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



या प्रकल्पात ज्या गावांमध्ये उसाचे क्षेत्र जास्त आहे, तसेच जे शेतकरी प्रगतशील असून ठिबक सिंचनाचा वापर करतात, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. किमान २५ ते ४० शेतकऱ्यांचा एक समूह या उद्देशाने शेतकऱ्यांची निवड केली जाईल. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मातीचा नमुना तपासून घेणे आवश्यक आहे. जर एकाच प्रकारची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र एकत्रित असेल, तर त्यांना एक हवामान केंद्र आणि दोन मातीमधील सेन्सरसाठी ९,००० रुपये भरावे लागतील. उर्वरित सर्व रक्कम साखर कारखाने आणि VSI च्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांना दिली जाईल.

या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी किती प्रमाणात द्यावे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा, अन्नद्रव्यांचे प्रमाण कसे ठेवावे, इत्यादी विविध बाबींची माहिती मिळणार असून, त्यामुळे ऊसाची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. सध्या धाराशिव जिल्ह्यात काही शेतकरी एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत, परंतु हे प्रमाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव जिल्ह्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) प्राथमिक क्षेत्राचा वाटा वाढवण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा असून प्रत्येक साखर कारखान्याला किमान २५० शेतकरी आणि २०% क्षेत्र (म्हणजेच २०,००० हेक्टर पर्यंत) या तंत्रज्ञानाखाली आणण्याचे आवाहन केले आहे. यासाठी कारखान्यांनी तात्काळ आपल्या सभासदांकडून करार करून ते लवकरात लवकर जमा करावेत, व   वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडे सादर करावेत जेणेकरून धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल अशा सूचना दिलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments