बळीराजासाठी विठ्ठलाकडे साकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीयमहापूजा संपन्न -
पंढरपुर प्रतिनिधी/रुपेश डोलारे: आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. पहाटे ३ च्या दरम्यान विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर उसळला आहे. पंढरीत पहाटे अडीच वाजल्यापासून पूजा, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. यावर्षी मानाच्या वारकरीपदाचा मान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि कल्पना उगले या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला अन् विठुरायाला साकडे घातले. राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी विठुमाऊलीला साकडे घातले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाची पूजा करण्याची संधी मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "ही पर्वणी अत्यंत आनंददायी आहे. वारीच्या माध्यमातून भक्त आणि भगवंत यांच्यातील अंतर दूर होते आणि एक अनोखी अनुभूती प्राप्त होते. श्री विठ्ठलाच्या पूजेनंतर मला खूप समाधान वाटले. देवाला आपल्या मनातील सर्व काही माहित असते. मी माऊलीला प्रार्थना केली की, त्यांनी राज्याची काळजी घ्यावी आणि आम्हाला सद्बुद्धी व ताकद द्यावी, जेणेकरून बळीराजाच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत."
"अनेक वर्षांपासून वारी सुरू आहे. मोगल काळ असो वा इंग्रज काळ, वारी कधीच थांबली नाही. वारीत संतांचा संदेश अनुभवायला मिळतो. दुसरीकडे ईश्वर क्वचितच दिसतो, पण वारीत तो प्रत्यक्ष भासतो. भागवत धर्माची पताका वारीच्या माध्यमातून कायम फडकत राहिली पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रगतीत आध्यात्मिक प्रगती महत्त्वाची आहे. विठ्ठल-रखुमाई हे आराध्य दैवत आहेत. पांडुरंगाचा आशीर्वाद नेहमी मिळो. पांडुरंग मनातील भाव ओळखतो. राज्यावरील पुढील संकटे दूर होऊन बळीराजा सुखी आणि समाधानी राहो, अशी मी प्रार्थना करतो, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले."
पंढरपूर कॉरिडॉरच्या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले, "पंढरपूर कॉरिडॉर बनवताना सर्वांना विश्वासात घेऊन कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मी सर्वांना हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कोणाचेही नुकसान न करता हा प्रकल्प पूर्ण होईल." तसेच, त्यांनी विठ्ठलाकडे शेतकऱ्यांच्या कल्याणाची प्रार्थना केली आणि सर्वांनी सुबुद्धीने वागावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, "आज आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे मी राजकीय बोलणार नाही. दरवर्षी वारी अधिक चांगली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी स्वच्छतेची व्यवस्था उत्तम आहे. कर्मचारी आणि पोलिसांची संख्या वाढवण्याबाबत योग्य निर्णय घेऊ."
0 Comments